Delhi woman shot over pizza sharing: केवळ पिझ्झाच्या वाटपावरून एका कुटुंबात वाद झाला आणि वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झालं. या गोळीबारात एक महिला जखमी झाली असून चार जणांना अटक झाली आहे. सदर घटनेवर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण दिल्लीच्या वेलकम नावाच्या परिसरात ही घटना बुधवारी (१६ ऑक्टोबर) घडली आहे. दोन जावांमध्ये पिझ्झाच्या तुकड्यावरून भांडण झालं. त्यानंतर संतापलेल्या जावेने आपल्या भावाला बोलावून घेतलं. ज्याने महिलेवर गोळीबार केला. पीडित महिलेच्या पोटात गोळी लागली असून तिच्यावर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, सदर महिलेची प्रकृती आता स्थिर आहे.

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, बुधवारी रात्री सदर घटना सलीमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला सादमाचा मेहुणा झिशान संपूर्ण कुटुंबासाठी पिझ्झा घेऊन आला होता. त्याने त्याचा छोटा भाऊ जावेदची बायको सादमासह घरातील प्रत्येकाला पिझ्झा खायला दिला. पण झिशानची बायको सादिया आणि सादमा यांच्यात आधीपासूनचा वाद होता. तिच्या नवऱ्याने सादमालाही पिझ्झा दिल्यामुळे दोघींमध्ये वाद सुरू झाला.

यानंतर सादियाने तिचे चार भाऊ मुंतहीर, तफसीर, शहजाद आणि गुलरेज यांना बोलावून घेतलं. चौघेही सादियाच्या घरी आल्यानंतर कुटुंबात जोरदार बाचाबाची झाली. या भांडणादरम्यान मुंतहीरनं सादमावर गोळीबार केला. यानंतर चौघा भावांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा सर्व अंगाने तपास करत आहोत. कुटुंबातील इतर सदस्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.