गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात देखील बुली बाई प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. बुली बाई अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करून आक्षेपार्ह भाषेत मजकूर टाकल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघड झाला होता. एका मुस्लीम महिला पत्रकाराचे फोटो देखील अशाच प्रकारे अपलोड झाल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. यानंतर मुंबई पोलिसांनी दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारावर तपास केल्यानंतर बंगळुरूमधून एका २१ वर्षीय तरुणाला अटक करण्या आली होती. मात्र, आता या प्रकरणातील मुख्य आरोपीलाही अटक झाली असून ती एक महिला असल्याचं समोर आलं आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.
या प्रकरणात आधी मुंबई पोलिसांनी बंगळुरूमधून एका २१ वर्षीय तरुणाला अटक केली होती. या तरुणाने या अॅपवर बुली बाईसारख्या आक्षेपार्ह मजकुरासाठी खोटी अकाउंट्स सुरू केली होती. यातल्या काही अकाउंट्सला शीख नावं देण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे. या तरुणाची गेल्या दोन दिवसांपासून पोलीस चौकशी करत आहेत. त्यानंतर आज उत्तराखंडमधून या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मुख्य आरोपी महिलाच!
दरम्यान, हा सगळा प्रकार घडवून आणणारी मुख्य आरोपी महिला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. ही महिला बुली बाई अॅपशी संबंधित तीन खाती हाताळत होती. बेंगलुरूमधून ताब्यात घेतलेल्या विशाल कुमार नामक तरुणाने खालसा सुप्रिमेसिस्ट नावाने एक अकाउंट ३१ डिसेंबर रोजी सुरू केलं होतं. यासोबत या अकाऊंटचे इतर बनावट खालसा सदस्य देखील दाखवण्यात आले होते, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
नेमका काय आहे हा प्रकार?
Github या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर BulliBai नावाचं एक अॅप महिलांच्या सौदेबाजी प्रकरणात सापडलं आहे. मुस्लीम महिलांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून त्यांचे फोटो या अॅपवर अपलोड करून त्यांचा लिलाव करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यावरून मोठा वादंग निर्माण झाला. एका महिलेने याबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्याचा तपास सुरू झाला. पोलिसांनी रविवारी या प्रकरणात बंगळुरूमधून एका २१ वर्षीय तरुणाला अटक केल्यानंतर आज उत्तराखंडमधून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. ही महिलाच मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
Bulli Bai App: मुस्लिम महिलांचे फोटो टाकत लिलाव करणारं हे प्रकरण नेमकं काय आहे?
असाच काहीसा प्रकार याआधीही ६ महिन्यांपूर्वी चर्चेत आला होता. तेव्हा Sulli Deal या नावाने मुस्लीम महिलांची अशा प्रकारे बदनामी करण्याचा प्रकार घडला होता. तेव्हा याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र, अद्याप आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्यामुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे.
यासंदर्भात राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्वीट करून मुंबई पोलिसांचं कौतुक केलं आहे.