केंद्रीय पर्यावरण खात्याने काही अटींवर बंदी हटवली
बैलगाडी शर्यतीवरील बंदी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शुक्रवारी हटवली . या निर्णयामुळे महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, पंजाब, हरयाणा, गुजरात, केरळमध्ये या शर्यती पुन्हा रंगणार आहेत. तामिळनाडूत जलिकट्ट या नावाने ओळखली जाणारी ही शर्यत या निर्णयामुळे पुन्हा सुरू होईल. मात्र केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बंदी उठवताना काही अटी निश्चित केल्या आहेत.
बैलगाडी शर्यतीमुळे ‘प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएलिटी टू अॅनिमल’ कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे सांगत ‘पेटा इंडिया’ या पशू अत्याचाराविरोधात लढणाऱ्या संस्थेने औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शर्यतीत बैलांना क्रूरपणे वागवण्यात येते आदी मुद्दे याचिकाकर्त्यांनी मांडले होते. त्यानंतर २०११ साली सर्वोच्च न्यायालयाने वाघ, माकड, सांड, बिबटय़ा, अस्वल या प्राण्यांच्या खेळावर तसेच प्रदर्शनावर बंदी घातली होती.
रायगडमध्ये जल्लोष
या निर्णयाचे रायगड जिल्ह्यत जोरदार स्वागत करण्यात आले. शर्यतींचे आयोजक आणि हौशी गाडीवानांनी एकत्र येऊन एकच जल्लोष केला.
अटी काय?
बैलगाडी शर्यतीच्या आयोजनस्थळासाठी जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आयोजकांना बंधनकारक राहणार आहे. शर्यत ज्या मार्गावर होणार आहे, तो दोन किलोमीटरपेक्षा जास्त लांब नसावा, तसेच त्या मार्गाची पूर्वपाहणी करणे आवश्यक असेल. शर्यतीत सहभागी होणाऱ्या बैलांची पशुवैद्यकीय चिकित्सकाकडून तपासणी करून घ्यावी, बैलास कोणतेही उत्तेजक औषध देण्यात येऊ नये, असे नियम निश्चित करण्यात आले आहेत.