Cash Recovered From Congress MP Seat : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज पुन्हा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत ‘काँग्रेस का हाथ सोरस के साथ’ घोषणा दिल्याचा विरोधी पक्षांच्या खासदारांनी तीव्र निषेध नोंदवला. यानंतर लोकसभेचे सत्र दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. मात्र यापूर्वी राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या जागेवरून नोटांची बंडल सापडल्याची माहिती राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी दिली. या प्रकरणावरून देखील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भिडल्याचे पाहायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी काल नियमीत तपासणीदरम्यान सभागृहात चलमी नोटा सापडल्याचा आरोप केला . सुरक्षा अधिकार्‍यांना राज्यसभा सभागृहातील आसन क्रमांक २२२ वर नोटांचे बंडल सापडले असल्याचे धनखड यांनी सांगितले. चलनी नोटा सापडलेली ही जागा सध्या काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांना नेमून देण्यात आलेली आहे. दरम्यान या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असल्याचेही धनखड यांनी सांगितले.

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड म्हणाले की, “मी सदस्यांना सूचित करत आहे की, काल सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर सभागृहाची नियमित तपासणी सुरू होती. सध्या अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आलेल्या जागेवर चलनी नोटांचा गठ्ठा सुरक्षा अधिकार्‍यांनी जप्त केला आहे. ही बाब लक्षात आणून देण्यात आल्यानंतर मी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे”.

अभिषेक मनु सिंघवी काय म्हणाले?

दरम्यान या संपूर्ण घटनेवर अभिषेक मनु सिंघवी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “मी राज्यसभेत जाताना फक्त ५०० ची एक नोट बरोबर ठेवतो. मी या प्रकरणाबद्दल पहिल्यांदाच ऐकतोय. काल मी बरोबर १२ वाजून ५७ मिनिटांनी सभागृहात आलो. सभागृहाचे कामकाज १ वाजता तहकूब झाले. त्यानंतर मी कॅन्टीनमध्ये १ वाजून ३० मिनिटांपर्यंत अयोध्या प्रसाद यांच्याबरोबर बसून होतो आणि नंतर निघून गेलो”.

दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हा सभागृहाच्या प्रतिष्ठेवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. सभागृहाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी यादरम्यान सिंघवी यांचे नाव देखील घेतले.

हेही वाचा>> “तू राहशील किंवा मी राहीन”, उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर फडणवीसांचं संयमी उत्तर ऐकून शिवसेना नरमली; राऊतांची सारवासारव

जेपी नड्डा यांनी काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांचे नाव घेतल्यानंतर काँग्रसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यावर आक्षेप घेतला. खरगे म्हणाले की, “मी विनंती करतो की जोपर्यंत या घटनेचा तपास पूर्ण होत नाही आणि याची सत्यता तपासली जात नाही तोपर्यंत कोणत्याही सदस्याचे नाव घेतले जाऊ नये”.

जगदीप धनखड यांच्या नोटांचे बंडल सापडल्याच्या खुलाशानंतर सभागृहात जोरदार गोंधळ झाला. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार वाद पेटला. काही सदस्यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली तर काहींनी हे एक राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bundle of currency notes found from congress mp abhishek singhvi seat rajya sabha probe ordered rak