कालिकतहून दुबईकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) विमानाचे इमर्जंसी लँडींग करण्यात आले. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाच्या केबिनमधून जळण्याचा वास येऊ लागल्यामुळे विमान मस्कतच्या दिशेने वळवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसचे B737-800 विमान कालिकतहून दुबईकडे चालले होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच कर्मचाऱ्यांना विमानाच्या केबिनमधून जळण्याचा वास येऊ लागला. उड्डाणाच्या अगोदर विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी कोणताही बिघाड नव्हता. मात्र, उड्डाणानंतर अचानक जळण्याचा वास येऊ लागल्यामुळे विमान मस्कतकडे वळवण्यात आले.
हेही वाचा- अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार, तिघांचा मृत्यू, नागरिकाने गोळी घालून हल्लेखोराला केलं ठार
गेल्या ४८ तासांमध्ये तीन विमानांमध्ये तांत्रिक बिघाड
गेल्या ४८ तासांमध्ये तीन विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचं इमर्जंसी लँडींग करावे लागल्याचे समोर आले आहे. शारजाहून कोचीनला जाणाऱ्या विमानात हायड्रोलिक बिघाड झाल्यामुळे त्याचं इमर्जंसी लँडींग करावे लागले होते. तसेच १५ जुलैला श्रीलंकन एअरलाइन्सच्या विमानाचे तांत्रिक बिघाडामुळे चैन्नई विमानतळावर इमर्जंसी लँडींग करण्यात आले होते. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ जुलैला आदिस अबाबाहून बँकॉकला जाणाऱ्या इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानातही तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे या विमानाचेही कोलकात विमानतळावर इमर्जंसी लँडींग करावे लागले होते.