Fake Death For 1 Crore Insurence : गुजरातमधील एका कर्जबाजारी हॉटेल व्यावसायिकाने १.२६ कोटींची रक्कम मिळवण्यासाठी कार अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र, या तरुणाचे षडयंत्र पोलिसांनी हाणून पाडले आहे. या प्रकरणी प्रमुख आरोपी दलपतसिंग परमार याच्या तीन जोडीदारांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी असलेला परमार अजूनही फरार आहे. दरम्यान ही घटना बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम या गावात घडली आहे.
शुक्रवारी वडगाम गावात एक जळालेली कार सापडली. यामध्ये मानवी शरीराचे जळालेले अवशेषही होते. वाहन नोंदणी क्रमांकाचा तपशील तपासल्यानंतर ती कार दलपतसिंग परमार (वय ४०) याची असल्याचे निष्पन्न झाले. यातील मृतदेह परमार याचाच असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते. परंतु, पोलिसांना याबाबत शंका आल्याने त्यांनी कारमधील मृतदेहाचे नमुने तपासण्याचा निर्णय घेतला. यानंतर पोलिसांनी मृतदेहाचे नमुने फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले. पण, ते कुटुंबातील सदस्यांकडून गोळा केलेल्या नमुन्यांशी जुळत नसल्याचे चाचणीत समोर आले. त्यामुळे पोलिसांचा या प्रकरणी संशय आणखी बळावला.
सव्वा कोटींसाठी बनाव
पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर त्यांना आढळले की, परमारने हॉटेल उभारण्यासाठी मोठे कर्ज घेतले होते. त्यामुळे तो कर्जात बुडाला होता. यातून बाहेर पडण्यासाठी परमारने, कार अपघातात आपला मृत्यू झाल्याचे दाखवण्याचा बनाव केला. परमारला यासाठी त्याचा भाऊ आणि इतर काही नातेवाईकांनी मदत केल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. परमारने अपघात संरक्षण विमा घेतला आहे, त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना १ कोटी २३ लाख रुपये मिळणार होते.
स्मशानभूमीतून मृतदेहाची चोरी
हा बनाव आखताना परमारने जवळच्या स्मशानभूमीतून मृतदेह चोरण्याचा निर्णय घेतला. परमार याच्यासह चार आरोपींनी रात्री उशिरा स्मशानभूमीतून चार आठवड्यांपूर्वी पुरलेला मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर हा मृतदेह परमार याच्या गाडीत ठेवण्यात आला आणि अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे भासवण्यासाठी गाडी पेटवून देण्यात आली. दरम्यान, गुजरातमधील काही हिंदू पंथीय मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ते पार्थिव दफन करतात.
सीसीटीव्हीमुळे गुन्हा उघड
दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात कारमधील जळालेला मृतदेह परमार यांचा नसल्याचे समोर आल्यानंतर, तो कोणाचा होता याचा शोध घेणे पोलिसांसमोर पुढचे आव्हान होते. यासाठी पोलिसांनी स्मशानभूमीचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, त्यांना रात्री चार लोक एक मृतदेह हलवित असल्याचे आढळले. पोलिसांनी आरोपींना त्यांचा खाक्या दाखवताच आरोपींनी हा मृतदेह परमार यांच्या गाडीत ठेवून गाडीला आग लावल्याचे कबूल केले.