Goa Accident: देशात शनिवारी २५ मे रोजी वेगवेगळ्या भागात मोठे अपघात झाल्याचं आपण पाहिलं. छत्तीसगडमधील सर्वात मोठ्या फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन मोठी आग लागली, उत्तराखंडमध्ये भाविकांच्या बसवर एक दगडांनी भरलेला डंपर उलटला, दिल्लीत एका रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली, तर गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागून २७ जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास गोव्यातील वेर्ना परिसरात एक मोठा बस अपघात झाला. दक्षिण गोवा जिल्ह्यातील एका औद्योगिक वसाहतीत खासगी बसने रस्त्याकडेला उभारण्यात आलेल्या झोपड्यांना धडक दिली असून या अपघातात चार जणांचा बळी गेला आहे. तसेच पाच जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. हे सर्व मजूर मूळचे बिहारचे रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे.
वेर्ना परिसरात रस्ते बांधणीचं काम करणारे मजूर त्याच रस्त्याच्या कडेला झोपडी बांधून राहत होते. मात्र शनिवारी रात्री एका खासगी बसने त्यांच्या झोपड्यांना धडक दिली. बस या झोपड्यांना भुईसपाट करून पुढे गेली.
पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई म्हणाले, “या बसचा चालक जवळच्याच कार्टोलिम गावचा रहिवासी आहे. भरत गोवेकर असं त्याचं नाव असून आम्ही त्याला ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची चौकशी चालू आहे. चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तो रात्री मद्यधुंद अवस्थेत बस चालवत होता हे उघड झालं आहे.” दरम्यान, एका मजुराने दावा केला आहे की, “बसचालक भरत गोवेकर त्यावेळी दारूच्या नशेत होता. त्याने नशेतच आम्हा इतर मजुरांना धमकी दिली की, आमच्यापैकी कोणी पोलिसांना सागितलं किंवा कुठे तक्रार केली तर तो आमची हत्या करेल.”
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, “एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसने दोन झोपड्या भुईसपाट केल्या आहेत. या झोपड्यांमध्ये रस्ता बांधणीचं काम करणारे मजूर झोपले होते. या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.”
हे ही वाचा >> “सपाचा कायदा-सुव्यवस्थेशी ३६ चा आकडा, त्यांनी दहशतवाद्यांना…”, मिर्झापूरमधून पंतप्रधान मोदींचा टोला
दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत या अपघाताची माहिती देत म्हणाल्या, एक बस रोसेनबर्गर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती. रात्री काम संपवून या कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी ही बस निघाली होती. दरम्यान, वेर्ना परिसरात रस्त्याच्या एका वळणावर चालक बस वळवत होता, मात्र त्यात तो अपयशी ठरला. या बसने रस्त्याकडेला लागून असलेल्या दोन झोपड्यांना धडक दिली. काही मजूर या झोपड्यांमध्ये झोपले होते. त्यांच्यापैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातावेळी बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता.