जम्मू काश्मीरमध्ये रविवारी (९ जून) तीर्थयात्रेला निघालेली बस दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. रियासी जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी येथे जात असताना बसवर गोळीबार झाला. त्याचवेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस दरीत कोसळली. या भीषण अपघातात १० भाविकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, रियासी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विशेष महाजन यांनी या दुर्घटनेची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, बस दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला आहे. काही दहशतवाद्यांनी या बसवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. यात्रेकरुंची ही बस शिव खोडी मंदिरात दर्शनासाठी जात होती. ही बस पोनी येथील तेरियात गावातून निघाली होती. बसमधील बहुसंख्य भाविक हे मूळचे याच गावचे रहिवासी आहेत. या हल्ला आणि दुर्घटनेत १० भाविकांनी आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी बचाव मोहीम हाती घेतली आहे. लष्कर आणि निमलष्करी दलाच्या तुकड्यादेखील तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. लष्करी तुकड्यांनी देखील मदतकार्य सुरू केलं आहे. तसेच या परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. लष्कराने या परिसरात हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
या दुर्घटनेचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागले आहेत. यामध्ये दिसत आहे की बस रस्त्यालगतच्या खोल दरीत कोसळली आहे. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी बचाव मोहीम हाती घेतली आहे. तसेच रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली आहे. तर काहीजण दरीत उतरून बचाव मोहिमेत योगदान देत आहेत. अनेक भाविक बसच्या आसपास असलेल्या दगडांवर पडल्याचं दिसत आहे. हे लोक बसच्या खिडकी आणि दरवाजातून बाहेर पडले असावेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.