Delhi : राजधानी दिल्लीमधील लाहोरी परिसरात दिवसाढवळ्या मोठा दरोडा पडल्याची घटना घडली आहे. एका व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून तब्बल ८० लाख रुपये लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. चोरट्याने व्यावसायिकाचा आधी पाठलाग केला आणि त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून लुटलं. ही संपूर्ण घटना लाहोरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हवेली हैदर कुली चांदणी चौकात घडल्याची माहिती सांगितली जात आहे.
दरम्यान, व्यापाऱ्याला लुटल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत व्यापाऱ्याला कसं लुटलं? याचा संपूर्ण घटनाक्रम कैद झाला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने व्यापाऱ्याकडून रोख रक्कम भरलेली बॅग हिसकावून घेण्याच्या आधी गोळीबार केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचं दिसत आहे.
या घटनेच्या व्हिडीओमध्ये एक मुखवटा घातलेला व्यक्ती एका व्यापाऱ्याचा पाठलाग करत असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर अचानक आरोपी बंदूक काढतो आणि व्यापाऱ्याला रोख रक्कम भरलेली बॅग देण्याची मागणी करतो. यानंतर कोणताही प्रतिकार न करता व्यापाऱ्याने पैशाने भरलेली बॅग दिल्याचं दिसत आहे, त्यानंतर हल्लेखोर ते पैसे घेऊन घटनास्थळावरून पळून जाताना दिसत आहे. हा सर्व प्रकार घडत असताना अनेकजण पाहत होते. पण कोणीही यामध्ये मदतीला आलेलं दिसत नाही.
या घटनेनंतर व्यावसायिकाने तात्काळ पोलीस ठाणे गाठून याबाबत पोलिसांत तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. तसेच या घटनेच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.