एका व्यावसायिकाच्या मुलाची ३० लाखांच्या खंडणी मागून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी संध्याकाळी दहावीत शिकणारा हा मुलगा त्याच्या क्लाससाठी स्कुटीवर गेला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या शिक्षिकेसह तिघांना अटक केली आहे. कुशाग्र कनोडिया असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे.
कुशाग्र कनोडिया हा कापड व्यावसायिक मनिष कनोडिया यांचा मुलगा होता. कुशाग्र दहावीत शिकत होता. त्याचं अपहरण करण्यात आलं आणि त्याची हत्या करण्यात आली. शनिवारी तो क्लासला गेला तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न त्याच्या आजोबांनी केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. कारण त्याचा फोन बंद येत होता. याच दरम्यान एक व्यक्ती कनोडिया यांच्या घरी कापड बांधून आला. त्याने एक चिठ्ठी कनोडियांच्या घरात फेकली. त्यात लिहिलं होतं तुम्हाला तुमचा मुलगा हवा असेल तर ३० लाखांची खंडणी तयार ठेवा. या चिठ्ठीत एक धार्मिक मजकूरही लिहिला होता. असंही समजतं आहे. सुरुवातीला पोलिसांना हे प्रकरण खंडणीचं वाटलं होतं मात्र हे प्रकरण वेगळं निघालं.
कुशाग्र ज्या महिला शिक्षिकेच्या घरी ट्युशनसाठी गेला होता, तिची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणातला वेगळा धागा पोलिसांच्या हाती लागला. शिकवणी घेणारी शिक्षिका आणि तिचा बॉयफ्रेंड यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी सगळी कबुली दिली. खंडणीची मागणी ही पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी करण्यात आली होती. पोलिसांनी या दोघांनाही कसून काही प्रश्न विचारले. त्यानंतर पोलीस या शिक्षिकेच्या घरी पोहचले तिथे स्टोअर रुममध्ये कुशाग्रचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुशाग्रचा मृत्यू संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान झाला. खंडणीची मागणी ही फक्त दिशाभूल करण्यासाठी करण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यांना हे समजलं की कुशाग्र त्याच्या इच्छेनेच शिक्षिकेच्या घरी गेला होता. कुशाग्र आधी घरात जातो, त्यानंतर त्याची शिक्षिका आणि तिचा बॉयफ्रेंड हे जाताना दिसतात. हे बाहेर येतात तेव्हा दोघंच असतात हे सगळं सीसीटीव्हीत दिसतं आहे. पोलिसांचा हा संशय आहे की त्याचवेळी कुशाग्रची शिक्षिका रचिता आणि तिचा बॉयफ्रेंड प्रभात या दोघांनी त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी रचिता, प्रभात आणि त्याचा मित्र आर्यन यांना अटक केली आहे. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.