गोव्यातील दुग्ध उत्पादकांना आता शेजारील महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू राज्यातून गाय खरेदी करता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमधील मध्यस्थांसाठी एक योजना सरकारने आखली आहे. यात गायींची खरेदी आणि विक्री करणे शक्य होईल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.
मे महिन्यात गोवा सरकारने गुरे खरेदी-विक्रीसाठी जाहीरातीच्या माध्यमातून निविदा मागविल्या होत्या. या वेळी महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या एका मध्यस्थाने खोटा पत्ता दिल्याचा मुद्दा काँग्रेस सदस्य अॅलिक्सो लॉरिनको रीजीनाल्डो यांनी सदनात उपस्थित केलेला होता. या प्रश्नाला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘दुग्ध उत्पादकांना गायींची खरेदी-विक्री करता यावी यासाठी राज्यात दर मंगळवारी गोशिबिर आयोजित करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीपासून गोवा सरकारने कोल्हापूरमधील पारंपरिक बाजारातून गुरे खरेदी करणे बंद केले होते. तामिळनाडूमधील इरोडमधून गुरांची खरेदी करण्यात येत होती. गोवा सरकार सध्या दुग्ध उत्पादनासाठी शेजारील राज्यांवर अवलंबून आहे. सरकारने दुग्ध उत्पादन वाढविण्याचा संकल्प केला असून यात १२ ते १५ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सरकारने दररोज तीन लाख लिटर दूध उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा