‘वन स्मॉल स्टेप ऑफ अ मॅन, जायंट लीप ऑफ मॅनकाइंड’ हे नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर उच्चारलेले पहिले शब्द होते असे मानले जात असले तरी प्रत्यक्षात तसे नाही. आर्मस्ट्राँग यांच्याबरोबरचा दुसरा चांद्रवीर बझ आल्ड्रिन याच्या तोंडचे ‘काँटॅक्ट लाइट’ हे चंद्रावर उच्चारले गेलेले पहिले शब्द होते असे आता स्पष्ट झाले आहे. अमेरिकेची ही चांद्रमोहीम १९६९मध्ये झाली होती. अपोलो ११च्या अंतराळवीरांनी वापरलेल्या मार्गदर्शिकेवरून हे स्पष्ट झाले आहे. या मार्गदर्शिकेचा लिलाव केला जाणार आहे. आल्ड्रिन याने वापरलेली ती स्वत:ची मार्गदर्शिका होती.
चंद्र पाहिलेला माणूस काय म्हणतो?
आल्ड्रिन यांनी या मार्गदर्शिकेसोबत ठेवलेल्या पत्रात म्हटले आहे, की चंद्रावतरण हा अविस्मरणीय अनुभव होता. जेव्हा आठ मिनिटे बाकी होती तेव्हा इंजिन प्रज्वलित करण्यात आले. नंतरचा अनुभव रोमांचकारी होता. नील आर्मस्ट्राँग हा उपकरणांची काळजी घेत होता व बाहेरील दृश्येही त्याला दिसत होती. त्याचे काम आणखी अवघड बनले, कारण आमचा संगणक आम्हाला मोठमोठय़ा खडकांनी वेढलेल्या मोठय़ा विवरात घेऊन जात होता. अवघ्या ५०० फूट उंचीवर असताना नील आर्मस्ट्राँगने ईगल यान मानवी पातळीवर नियंत्रित करायला सुरुवात केली. त्याने अवतरणाचा वेग सेकंदाला काही सेकंदांनी कमी केला. आजूबाजूच्या प्रदेशाचा अभ्यास केला. नीलने मला इंधनाची स्थिती विचारली. आठ टक्के इंधन आहे असे मी सांगितले, त्या वेळी मी बाहेर नजर टाकू शकत होतो. अवतरणाचा क्रम एवढा का लांबला आहे याचे भान तेव्हा आले, कारण सगळीकडे विवरे, खडक दिसत होते. साठ सेकंदांइतकेच इंधन उरल्याचे मिशन कंट्रोलने सांगितले व नंतर तीस सेकंद उरल्याचे हेडसेटमध्ये ऐकू आले. नील हा जवळपास चंद्राच्या पृष्ठभागाजवळ होता. इंजिनाच्या धुराने धुळीचे लोट उठले होते त्या परिस्थितीतही त्याला अवतरणाचे ठिकाण शोधायचे होते. नंतर त्याला एक खडक दिसला, त्यामुळे त्याला अवतरणासाठी संदर्भस्थान मिळाले. नीलने ईगल यान चंद्रावर उतरवले त्या वेळी मी पहिले शब्द उच्चारले ते म्हणजे ‘काँटॅक्ट लाइट’. आमच्या कंट्रोल पॅनेलवरच्या इंडिकेटर लाइटबाबत ते वाक्य होते, कारण तो लाइट लागल्यानेच यान चंद्रावर उतरल्याचे स्पष्ट झाले होते. त्या वेळी आमच्याकडे वीस सेकंद पुरेल एवढेच इंधन शिल्लक उरले होते.
नवे काय?
अपोलो ११ यानाच्या ईगल या मोडय़ुलचे सारथ्य मात्र नील आर्मस्ट्राँगने केले होते. चांद्रमोहिमेत वापरण्यात आलेल्या वस्तूंचा ताबा त्या मोहिमेतील अंतराळवीरांकडे देण्याचा नवा कायदा गेल्याच वर्षी करण्यात आला आहे. आल्ड्रिनच्या या मार्गदर्शिकेला बोनहॅम संस्थेतर्फे २५ मार्च रोजी न्यूयॉर्क येथे केल्या जाणाऱ्या लिलावात विक्रमी साठ हजार पौंड इतकी किंमत येण्याची शक्यता आहे. ईगल हे छोटे यान चंद्राच्या पृष्ठभूमीच्या निकट जाऊ लागले तेव्हाच्या माहितीची नोंद या मार्गदर्शिकेत आहे. ‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार आल्ड्रिन यांनी उच्चारलेले ‘काँटॅक्ट लाइट’ हे पहिले शब्द होते. यान चांद्रभूमीवर उतरले आहे की नाही याची खातरजमा करताना त्यांनी चंद्रावरील हे पहिले शब्द उच्चारले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा