देशातील सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशमधील चार लोकसभा आणि आठ विधानसभेच्या जागांसाठी मंगळवारी मतमोजणी पार पडली. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचा गड कायम राखण्यात यश मिळवलं असल तरी त्रिपुरामध्ये कम्यूनिस्ट पक्षाने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत धक्का दिला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व कायम आहे. मध्यप्रदेशमध्येही भाजपचा झेंडा दिमाखात फडकला आहे.

लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या आठ जागांसाठी १९ नोव्हेंबरला मतदान झाले होते. या मतदारसंघामध्ये मंगळवारी कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी पार पडली. मध्य प्रदेशमधील शहाडोल आणि नेपानगरमधून भाजपने बाजी मारली आहे. नेपानगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मंजू दादू यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर ४२ हजार मतांनी विजय मिळवला. शहाडोल लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानसिंह यांनी काँग्रेस उमेदवार हिमाद्री सिंह यांच्यावर मात करत लोकसभेतील जागा पक्की केली. शहाडोलमधून तब्बल १७ उमेदवार रिंगणात होते. आसाममध्येही भाजपची जादू कायम असून लखीमपूर लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवाराने विजय मिळवला आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असून भाजपसाठी या पोटनिवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. भाजपला त्यांच्या जागा कायम राखण्यात यश मिळाल्याने पक्षनेत्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. पुद्दचेरीमध्ये नेल्लीतोपे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आणि राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे आमदार ए. जॉन कुमार यांनी नारायण सामींसाठी ही जागा सोडली होती. नारायण सामी यांनी एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक लढवली नव्हती. या राज्यात काँग्रेसने बहुमत प्राप्त केल्यावर नारायण सामी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा दबदबा कायम आहे. तामलूक आणि कुचबिहार लोकसभा मतदारसंघातून तृणमूलच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवला. तर मोंतेश्वर विधानसभा मतदारसंघात तृणमूलच्या उमेदवारांने कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारावर मात केली.

तामिळनाडूमध्येही सत्ताधारी एआयएडीएमकेने वर्चस्व कायम राखले आहे. तिरुपरकुंदरम, तंजौर आणि अर्वाकुरिची या तिन्ही मतदारसंघांमध्ये एआयएडीएमकेच्या उमेदवारांचाच विजय झाला आहे. या तिन्ही मतदारसंघांमध्ये मुख्य लढत एआयएडीएमके आणि डीएमके या पक्षांमध्ये होती. त्रिपुरामध्ये कम्यूनिस्ट पक्षाने काँग्रेसला पराभवाचा धक्का दिला आहे. त्रिपूरा विधानसभेच्या ६० पैकी ५१ जागांवर आता कम्यूनिस्ट पक्षाचे आमदार आहेत. त्रिपु-यामधील दोन जागांवर पोटनिवडणूक झाली होती. यातील खोवई मतदार संघात कम्यूनिस्ट पक्षाने वर्चस्व कायम राखले. तर दुस-या जागेवर बरजाला मतदारसंघात कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. विशेष म्हणजे या मतदारसंघात यापूर्वी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपच्या देसिंगो पुल यांनी विजय मिळवला. देसिंगो पुल या माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांच्या पत्नी आहेत. कालिखो पुल यांनी आत्महत्या केल्याने ही जागा रिक्त झाली होती. पोटनिवडणुकांमध्ये सर्वच राज्यांमध्ये सत्ताधा-यांनी त्यांचे वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवले.

Live Updates
16:17 (IST) 22 Nov 2016
15:29 (IST) 22 Nov 2016
मध्यप्रदेशमधील शहाडोलमधूल भाजप उमेदवार विजयी
15:29 (IST) 22 Nov 2016
तामिळनाडूतील थंजावूरमध्ये एआयएडीएमकेचा उमेदवार विजयी
13:07 (IST) 22 Nov 2016
पश्चिम बंगालमधील कुच बिहार मतदारसंघात तृणमूल काँग्रेस आघाडीवर
12:12 (IST) 22 Nov 2016
मध्यप्रदेश: नेपानगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मंजू दादू ४० हजार मतांनी विजयी
Story img Loader