भ्रष्टाचार आणि औचित्यभंगाच्या आरोपांवरून राजीनामा द्यावे लागलेले रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल आणि विधी व न्याय मंत्री अश्वनीकुमार यांच्या मंत्रालयांचा अतिरिक्त कार्यभार शनिवारी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री सी. पी. जोशी आणि दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांच्याकडे सोपविण्यात आला. शुक्रवारी रात्री बन्सल यांच्यापाठोपाठ अश्वनीकुमार यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.
जोशी हे शनिवारी परदेश दौऱ्यासाठी रवाना होणार होते. पण त्यांना थांबवून रेल्वे मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. किरकोळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या निर्णयावरून गेल्यावर्षी ममता बनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर मुकुल रॉय यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या रेल्वे मंत्रालयाची जबाबदारीही जोशी यांच्याकडेच सोपविण्यात आली होती. यूपीए-२ मध्ये आतापर्यंत चार वर्षांत चार रेल्वे मंत्री बदलले गेले आहेत. सर्वोच्च न्यायालयासाठी कोळसा खाणवाटप घोटाळ्याचा अहवाल तयार करणाऱ्या सीबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून अश्वनीकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मंत्रालयाची सूत्रे सिब्बल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
गेल्या चार वर्षांत विधी व न्याय मंत्रालयाचे वीरप्पा मोईली, सलमान खुर्शीद आणि अश्वनीकुमार असे तीन मंत्री बदलले गेले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा