एन. श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यापासून रोखावे, अशी मागणी करणारी याचिका बिहार क्रिकेट मंडळाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
येत्या २९ सप्टेंबरला होणाऱया बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. सध्या मंडळाचे अध्यक्ष असलेल्या श्रीनिवासन यांनी पुन्हा निवडणुकीला उभे राहणार असल्याचे गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. त्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली. या विषयावरील न्यायालयातील सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत श्रीनिवासन यांची बीसीसीआयच्या कोणत्याही समितीवर निवड करण्यात येऊ नये, अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी, यासाठी बिहार क्रिकेट मंडळातर्फे मंगळवारी न्यायालयात युक्तिवाद करण्यात येणार आहे.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयने नेमलेली चौकशी समिती बेकायदा ठरविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बिहार क्रिकेट मंडळ आणि बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या परस्परविरोधी याचिकांवर ऑक्टोबरमध्ये सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Story img Loader