पीटीआय, बंगळूरु, नवी दिल्ली : कर्नाटकचे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी शुक्रवारी दिल्लीहून बंगळुरूत परतल्यावर पत्रकारांना सांगितले, की राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी दुपारी होईल आणि संध्याकाळपर्यंत खात्यांचे वाटप केले जाईल. चार किंवा पाच मंत्रिपदे वगळता उर्वरित पदांसाठी शनिवारीच निवड होईल.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी स्वतंत्र भेट घेतली. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी विचारविनिमय करण्यासाठी ते दिल्लीत आले आहेत. त्यांनी कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे संघटनात्मक सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेऊन विचारविनिमय केला. कर्नाटक मंत्रिमंडळात आणखी २० मंत्र्यांचा समावेश करण्याचा विचार सुरू आहे. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याआधी चर्चेची आणखी एक फेरी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. २० मे रोजी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
२४ जागांसाठी अनेक इच्छूक
कर्नाटक मंत्रिमंडळात ३४ मंत्री समाविष्ट करता येऊ शकतात. सिद्धरामय्या, शिवकुमार यांच्यासह आठ मंत्र्यांचा आधी शपथविधी झाल्याने आता मंत्रिमंडळातील २४ जागा रिक्त आहेत. मात्र, इच्छुकांची संख्या अधिक असल्याने या निवडीचे आव्हान श्रेष्ठींसह मुख्यमंत्र्यांसमोर उभे राहिले आहे. सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारे, ज्येष्ठत्वाचा निकष आणि ज्यांच्याबाबत कुणाचाही आक्षेप नाही, स्वीकारार्हता असलेल्या आमदारांच्या नावांचा मंत्रिपदासाठी विचार होत आहे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार आपापल्या निकटवर्तीय आमदारांना मंत्रिपद देण्याविषयी आग्रही असल्याने, यावरून दोघांतील मतभेद समोर येत आहेत.