केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा वारंवार घडत असतात. मग त्यासाठी कधी कुठल्या कार्यक्रमात या दोघांनी एकमेकांना नमस्कार केला की नाही? किंवा संसदेत मोदी बोलत असताना सर्व सदस्यांनी बाकं वाजवली, पण गडकरींनी बाकं वाजवली नाहीत वगैरे मुद्द्यांचा आधार घेतला जातो. यासंदर्भात खुद्द उद्धव ठाकरेंनीच “भाजपामध्ये मान-सन्मान मिळत नाही”, असं गडकरींनी आपल्याला सांगितल्याचा दावा जाहीरपणे केला. या सर्व दाव्यांमागे नेमकं सत्य काय आहे? यावर खु्द्द नितीन गडकरींनीच खुलासा केला आहे.
मोदींशी संबंधांबाबत काय म्हणाले नितीन गडकरी?
नितीन गडकरींनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मतभेद असल्याचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ दाखवून आमच्यात मतभेद असल्याचे दावे केले जात असल्याचंही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
“निवडक व्हिडीओ दाखवले जात आहेत. त्यातून आमच्यात विसंवाद असल्याचं सांगितलं जातं. अनेकांमध्ये मोदींवर थेट हल्ला करण्याची हिंमत नाही. त्यामुळे ते माझ्या बोलण्याचा गैरअर्थ लावून आपले मुद्दे मांडतात. कुणीतरी एकजण असं काहीतरी टाकतो. नंतर इतर माध्यमं त्याचा आधार घेऊन बातम्या देतात. आमच्यात कोणत्याही प्रकारचे तणाव नाहीत”, असं नितीन गडकरी म्हणाले.
“मी त्यांना सांगतो, तुम्हाला योग्य वाटेल ते करा”
“आमचं बोलणंही होत असतं. माझा एक स्वभाव आहे. मी मला दिलेल्या कामात लक्ष देतो. मुंबईतही फारसा येत नाही. त्यांनी मला विचारलं तरी त्यावर फारसं मतप्रदर्शन करत नाही. मी त्यांना सांगतो तु्म्हाला जे योग्य वाटेल ते करा. पक्षानं दिलेलं काम व्यवस्थित करणं हेच आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत”, असं नितीन गडकरी म्हणाले.
उमेदवारी पहिल्या यादीत का आली नाही?
नितीन गडकरींना भाजपाकडून नागपुरातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, ही उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर न करता दुसऱ्या यादीत जाहीर करण्यात आली. त्यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात असताना त्यावरही नितीन गडकरींनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“आमच्याकडे संसदीय समिती महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करते आणि त्यानंतर उमेदवारांची घोषणा केली जाते. पहिल्या यादीवेळी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरात या प्रदेशाच्या नेत्यांबरोबर ही पहिली चर्चा झाली. त्यामुळे तिथले उमेदवार जाहीर झाले. महाराष्ट्रात आमच्याबरोबर इतर पक्ष आहेत. त्यामुळे सगळ्यांची चर्चा करून संसदीय समितीसमोर जायला उशीर झाला. त्यामुळे माझं नाव दुसऱ्या यादीत आलं”, असं नितीन गडकरी म्हणाले.