गेल्या महिन्याभरात बिहारमध्ये घडलेल्या राजकीय महाभारताचे सूत्रधार अर्थात लोकजनशक्ती पार्टीचे लोकसभेतील पक्षनेते पशुपतीकुमार पारस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर पूर्णपणे चेहरामोहरा बदलल्याचं दिसून येत आहे. आज एकूण ४३ मंत्र्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला असून त्यामध्ये काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपामध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यासोबतच चिराग पासवान यांना खुलं आव्हान देणाऱ्या पशुपतीकुमार पारस यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. नव्या मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

बिहारमधला एक प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टीमध्ये सुरू असलेली यादवी गेल्या महिन्याभरापासून देशभरात चर्चेचा विषय ठरली. दिवंगत रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी पक्षाची सूत्र हाती घेतली. मात्र, रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू पशुपतीकुमार पारस यांच्यासोबत निर्माण झालेले मतभेद चव्हाट्यावर आले आणि पक्षामध्ये उभी फूट पडली. आधी चिराग पासवान यांना डावलून पशुपती कुमार यांना लोकसभेतील पक्षाच्या नेतेपदी बसवून ५ खासदारांनी बंड पुकरलं. त्यापाठोपाठ चिराग पासवान यांच्या गटानं थेट पशुपती कुमार यांच्यासोबत या ५ खासदारांना पक्षातून बेदखल केलं. त्यानंतर पुन्हा पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पशुपती कुमार यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व गेल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे आधी बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारला पाठिंबा देण्यावरून सुरू असलेला वाद आता पक्षामधील दुफळीला कारणीभूत ठरू लागला आहे.

हनुमानाचा राजकीय वध होत असताना राम शांत बसणार नाहीत असा विश्वास – चिराग पासवान

काही दिवसांपूर्वीच चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच या वादामध्ये मध्यस्थी करून योग्य तो न्याय करण्याचं साकडं घातलं होतं. “मी आजपर्यंत हनुमानाप्रमाणे पंतप्रधानांना प्रत्येक अडचणीच्या काळात साथ दिली. आज जेव्हा हनुमानाचा राजकीय वध करण्याचा प्रयत्न होत असताना मला विश्वास आहे की अशा परिस्थितीत राम शांत बसणार नाहीत”, असं चिराग पासवान म्हणाले आहेत. “मी प्रत्येक मुद्द्यावर भाजपाच्या सोबत उभा राहिलो. मग तो सीएए, एनआरसीचा मुद्दा का असेना. पण नितिश कुमार यांनी त्याला विरोध केला. आता भाजपाला निर्णय घ्यायचाय की त्यांनी मला पाठिंबा द्यायचा की नितिश कुमार यांना”, असं चिराग पासवान म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या आवाहनाकडे मोदींनी साफ दुर्लक्ष केल्याचंच पशुपतीकुमार पारस यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून दिसून येत आहे.

 

चिराग पासवान यांचा मंत्रिमंडळ विस्तारावर त्रागा!

दरम्यान, पशुपतीकुमार पारस यांची केंद्रीय मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यावर चिराग पासवान यांनी ट्वीटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. “पक्ष आणि प्रमुख नेतृत्वाला दगा देण्याच्या कारणाखाली लोकजनशक्ती पक्षाने पशुपतीकुमार पारस यांना आधीच पक्षातून निलंबित केलं आहे आता त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यावर पक्षाकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात येत आहे”, असं ट्वीट चिराग पासवान यांनी केलं आहे.

Story img Loader