कोलकाता उच्च न्यायालयाने भाजपाला दिलासा देताना पश्चिम बंगालमध्ये ‘गणतंत्र बचाओ यात्रा’ काढण्याची परवानगी दिली आहे. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारसाठी हा धक्का मानला जातोय.


पश्चिम बंगाल सरकारकडून भाजपाच्या रथयात्रेला परवानगी नाकारण्यात आली होती. या निर्णयाविरोधात भाजपाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. भाजपाच्या रथयात्रेमुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो, असा अहवाल गुप्तचर संस्थांकडून देण्यात आला होता. त्यामुळे यात्रेला परवानगी नाकारली होती असं आज पश्चिम बंगाल सरकारच्या वकिलाने न्यायालयात सांगितलं. त्यावर, भाजपाच्या वकिलांकडून, ‘रथयात्रेला परवानगी नाकारायची हे आधीच ठरलं होतं. परवानगी न देण्यासाठी राज्य सरकारकडून कोणतंही ठोस कारण देण्यात आलेलं नाही. इंग्रजांचं राज्य असताना महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली त्यावेळी कोणी त्यांना अडवलं नाही, पण हे सरकार राजकीय रॅलीसाठी परवानगी नाकारतंय, असा युक्तीवाद केला.

यापूर्वी शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या रथयात्रेला परवानगी दिली तर जातीय तेढ निर्माण होऊ शकतो असं म्हणत परवानगी नाकारली होती. 22 डिसेंबरला कूचबिहार येथून ही यात्रा सुरू होत असून 24 डिसेंबर रोजी दक्षिण परगना जिल्ह्यातील काकद्वीप येथून 26 डिसेंबर रोजी बीरभूम जिल्ह्यातील तारपीठ मार्गे असणार आहे.

Story img Loader