गेल्या दोन दिवसांपासून कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय चर्चेत आले होते. रविवारी गंगोपाध्याय यांनी आपण न्यायमूर्ती पदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यांच्या राजीनाम्यामागे राजकीय कारण असल्याची चर्चा कोलकात्यामध्ये रंगली होती. त्यातच आपण राजकारणात जाण्याचा विचार करत असल्याचे सूतोवाचही गंगोपाध्याय यांनी दिले होते. त्यानुसार आज कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांनी आपण भाजपामध्ये जात असल्याचं जाहीर केलं. तसेच, यावेळी त्यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली.
माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनी मंगळवारी त्यांचा राजीनामा देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला. तसेच, त्याची एक प्रत देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व एक प्रत कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती टी. एस. शिवग्नानम यांच्याकडे पाठवली. यानंतर त्यांनी सॉल्ट लेक परिसरातील त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली.
राजीनाम्यानंतर काय म्हणाले गंगोपाध्याय?
माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनी यावेळी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. “मी भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. हा पक्षप्रवेश बहुधा येत्या ७ मार्च रोजी होईल. तृणमूल काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात लढणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. पण आगामी लोकसभा निवडणूक मी लढवेन की नाही, यावर पक्ष निर्णय घेईल”, असं ते म्हणाले.
तृणमूल काँग्रेसवर आगपाखड!
दरम्यान, भाजपा प्रवेशाची घोषणा केल्यानंतर अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर आगपाखड केली. “मला हे पाऊल उचलण्यासाठी भाग पाडलं गेलं. सत्ताधारी पक्षाकडून वारंवार मारल्या जाणाऱ्या टोमण्यांमुळे मी हा निर्णय घेतला. त्यांच्या विधानांमुळे मला हे पाऊल उचलण्याची प्रेरणा मिळाली. सत्ताधारी पक्षाने अनेक वेळा माझा अवमान केला आहे. त्यांच्या प्रवक्त्यांनी असंसदीय शब्द उच्चारून माझ्यावर हल्ला केला आहे. मला वाटतं त्यांची शिक्षणाची मोठी समस्या आहे”, अशा शब्दांत गंगोपाध्याय यांनी तृणमूलवर टीका केली.
राजकारणात येण्यासाठी न्यायाधीशपदाचा राजीनामा; अभिजीत गंगोपाध्याय यांच्यावर टीकेची झोड!
“मला अनेकदा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून जनतेमध्ये उतरून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं गेलं आहे. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा मी विचार केला”, असा टोलाही गंगोपाध्याय यांनी यावेळी लगावला.
कोण आहेत अभिजीत गंगोपाध्याय?
अभिजीत गंगोपाध्याय यांनी अनेक वर्षं कोलकाता उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलं आहे. मात्र, त्यांच्या कारकिर्दीत अनेक वाद झाल्याचंही पाहायला मिळालं. मोठ्या खंडपीठाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करणे, एका वृत्तवाहिनीला मुलाखत देणे, थेट सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीलाच आदेश देणे अशा प्रकारच्या गोष्टींमुळे गंगोपाध्याय अनेकदा वादातही सापडले होते.