अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे केलेला हल्ला हा मूळ पाकिस्तानी असलेल्या व्यक्तीने केला होता, त्याचा दहशतवाद्यांशीही संबंध होता. तो व त्याच्या पत्नीला मूलतत्त्ववादाची शिकवण देण्यात आली होती असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडला असून ते दुसऱ्या हल्ल्याचीही तयारी करीत होते. आताच्या हल्ल्यात १४ ठार तर २१ जण जखमी झाले होते.
पोलिसांनी सांगितले, की सय्यद रिझवान फारूक (वय २८) व त्याची पत्नी तशफीन मलिक (वय २७) यांच्या घरात शस्त्रास्त्रे व स्फोटके सापडली, त्यात पाइपबॉम्ब व दारूगोळ्याचाही समावेश होता. एफबीआयने या प्रकरणाची तपास सूत्रे घेतली असून कॅलिफोर्नियात सॅन बेरनार्डिनो येथे बुधवारी हा गोळीबार झाला होता. या दोघांनी हल्ला का केला असावा याचा शोध घेण्यासाठी सेलफोन, संगणकाचे हार्डड्राइव्ह तपासले जात आहेत. एफबीआयने हा गोळीबार दहशतवादी हल्ला होता असे गृहीत धरूनच तपासाला सुरुवात केली असली, तरी अजून तसे सिद्ध झालेले नाही. फारूक हा मूळ पाकिस्तानी असून त्याची पत्नी पाकिस्तानी नागरिक आहे, त्यांनी इनलँड रिजनल सेंटर येथे लोकांवर १५० गोळ्या झाडलय नंतर पोलिसांशी चकमकीत हे जोडपे मारले गेले. मृतांची नावे समजली असून ते २६ ते ६० वयोगटातील आहेत. फारूकची इलेक्ट्रॉनिक यंत्रे तपासली जात असून हल्ल्याच्या एकदिवस अगोदर त्याने माहिती नष्ट करण्यास सुरुवात केली होती. फारूक व मलिक हे दोघेही विशिष्ट प्रकारचा पोशाख करून आले होते व त्यांनी दोन हँडगन खरेदी केल्या होत्या. ज्याच्याकडून त्या खरेदी केल्या त्याची चौकशी सुरू आहे, असे शहर पोलिस प्रमुख जॅरॉड बुरग्वान यांनी सांगितले. ते दुसरा हल्ला करू शकले असते एवढी शस्त्रे त्यांच्याजवळ होती. एफबीआयच्या लॉसएंजल्स कार्यालयाचे सहायक संचालक डेव्हीड बोडिच यांनी सांगितले, की ते दुसरा हल्लाही करणार होते कारण त्यांच्याकडे शस्त्रसाठा होता पण ते तसे का करणार होते हे माहिती नाही. फारूक हा काही दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. त्याचे एका व्यक्तीशी बोलणे झाले होते व त्याला दहशतवादाच्या संशयावरून ताब्यात घेतले आहे. फारूकचे आईवडील हे पाकिस्तानातून आलेले आहेत. फारूक व मलिक हे दोघेही एफबीआयच्या यादीत नव्हते. मलिकला इस्लामाबादमधून अमेरिकी व्यक्तीची जोडीदार म्हणून व्हिसा (के १ व्हिसा – तो विवाहासाठी दिला जातो पण विवाह केला नाही तर ९० दिवसांत रद्द होतो) मिळाला होता. त्यावर ती अमेरिकेत आली व ते विवाहबद्ध झाले.

Story img Loader