अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतामधील एका बेटावर चक्क १ लाख ३० हजार डॉलर म्हणजे ९१ लाख ६२ हजार रुपये पगाराची नोकरी उपलब्ध आहे. हा पगार दोन लोकांमध्ये वाटला जाईल. तरी वर्षाला ४५ लाखांहून अधिक रुपयांचा पगार देणारी ही नोकरी आहे तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा नोकरी स्वीकारणाऱ्याला केवळ या बेटावर असणाऱ्या दीपस्तंभाची देखरेख करावी लागणार आहे. या दीपस्तंभाला ऐतिहासिक महत्व असल्याने त्याच्या देखरेखीसाठी इतकी मोठी रक्कम मोजण्यास स्थानिक प्रशासन तयार झाले आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार ही नोकरी स्वीकारणाऱ्या व्यक्तीला सॅन फ्रॅन्सिस्को खाडीचा भाग असणाऱ्या सॅन पॅब्लो खाडीमधील ईस्ट ब्रदर लाइट स्टेशन येथे रिपोर्टींग करावे लागणार आहे. या दीपस्तंभाची स्थापना १८७४ मध्ये करण्यात आली होती. फ्रॅन्सिस्को खाडीमधून ये जा करणाऱ्या सैनिकांची दिशाभूल होऊ नये म्हणून या दीपस्तंभाची स्थापना करण्यात आली होती. १९६० साली या दीपस्तंभामध्ये स्वयंचलित यंत्रणा बसवण्यात आली. हा दीपस्तंभ आजही खाडीतून जाणाऱ्या जाहजांना आणि खलाशांना दिशा दाखवण्यासाठी फायद्याचा ठरतो. अमेरिकेच्या तटरक्षक दलाकडे या दीपस्तंभाचा ताबा असून कारभाराची जबाबदारी ‘ईस्ट ब्रदर लाइटहाऊस’ या बिगनफा तत्वावर चालणाऱ्या गटाकडे आहे.

१९७९ पासून या दीपस्तंभाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी जेवणाची आणि राहण्याची सोय केली जाते. यामधून मिळणाऱ्या निधीचा उपयोग दीपस्तंभाच्या देखरेखीसाठी केला जातो. कॅलिफॉरिनियाच्या रिचमंड येथील महापौर टॉम बट्ट यांनी ४० वर्षे या दीपस्तंभाच्या देखभालीचे काम केले. ते स्वत: या दीपस्तंभाची देखभाल करणाऱ्या गटाचे प्रमुख आहेत. ‘या दीपस्तंभाकडे मध्यंतरी सरकारने दूर्लक्ष केले होते. त्यावेळी आम्ही या दीपस्तंभाचा कारभार चालवण्यासाठीचे हक्क मिळवले. त्याच अंतर्गत येथील सोयीसुविधांमधून मिळणारे उत्पन्न दीपस्तंभाच्या देखभालीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.’ अशी माहिती टॉम यांनी सीएननशी बोलताना दिली. ईस्ट ब्रदर या वेबसाईटवरील जाहिरातीनुसार येथे काम करण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला पर्यटन क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच अमेरिकेतील कोर्ट गार्ड कमर्शियल बोट ऑप्रेटर्स लायसन्स त्या व्यक्तीकडे असणेही अनिवार्य आहे.

Story img Loader