G20 Summit 2022 in Bali: ‘जी २०’ परिषदेत सहभागी झालेले कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांना करोनाची लागण झाली आहे. इंडोनेशियातील बाली येथे ही परिषद पार पडत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंबोडियाच्या पंतप्रधानांनी काही दिवस आधीच Asean परिषदेत जागितक नेत्यांची भेट घेतली होती. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचाही समावेश होता. या परिषदेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान करोनाची लागण झाल्याने त्यांनी ‘जी २०’ परिषदेतील सर्व बैठका रद्द केल्या आहेत.
फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कंबोडियाच्या पंतप्रधानांनी आपल्याला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. सोमवारी रात्री आपण चाचणी केली आणि मंगळवारी डॉक्टरांनी करोना झाल्याचा अहवाल दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आपण कंबोडियाला परत जात असून ‘जी २०’ परिषदेतील सर्व बैठका रद्द केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान त्यांनी भेट घेतलेले जो बायडन परिषदेत सहभागी झालेले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांची भेट घेतली आहे.
विश्लेषण: महासाथीनंतरच्या तिसऱ्या हिवाळ्यात नवीन करोना लाट?
आपण सोमवारी रात्री उशिरा बालीमध्ये दाखल झालो आणि सुदैवाने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर नेत्यांसोबत डिनरसाठी जाऊ शकलो नाही असंही ते म्हणाले आहेत. आपल्याला करोनाची लागण नेमकी कधी झाली याबाबत काही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कंबोडियात पार पडलेल्या दक्षिणपूर्व आशियाई देशांच्या परिषदेत रविवारी त्यांनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली होती. यामध्ये अमेरिका, कॅनडा, जपान या देशांचे प्रमुख तसंच रशिया आणि चीनमधील महत्त्वाच्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.