पाच तासांत तीन वेळा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका ३५ वर्षीय मोहम्मद सादिक खत्रीचा या आरोपीला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १६ वर्षीय मुलीला तिच्या मित्राला भेटण्यास मदत करेन, असं आमिष या व्यक्तीने दाखवलं होतं. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
आरोपींना शिक्षा देताना नवसारी विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश टी. एस ब्रह्मभट्ट यांनी निरीक्षण नोंदवलं की मोहम्मद सादिक खत्रीचा गुन्हा नैतिक अधःपतनाचे कृत्य आहे. अटक केल्यावर त्या व्यक्तीकडे लैंगिक वर्धक गोळ्याही सापडल्या. यामुळे असहाय्य किंवा लहान मुलांची शिकार करण्याची त्याची विकृत मानसिकता दिसते, असे न्यायालयाने म्हटले आहे. गुन्ह्यादरम्यान त्याने या गोळ्या वापरल्या असाव्यात, असा संशयही व्यक्त करण्यात आला.
नेमकं प्रकरण काय?
ही मुलगी वलसाडच्या पारडी तालुक्यात राहते. शेअरचॅटवरून तिची महाराष्ट्रातील भिवंडी येथील एका व्यक्तीशी ओळख झाली. जवळपास सात महिने हे दोघे सोशल मीडियावर बोलत होते. त्यानुसार, १८ ऑक्टोबर २०२१ रोजी त्या व्यक्तीने पीडित मुलीला भेटण्याचा आग्रह केला, त्याकरता त्याने तिला मुंबईत बोलावले. त्यानुसार, पीडित मुलगी वापी रेल्वे स्थानकावर पोहोचली आणि मुंबईला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढली. या प्रवासादरम्यान ती आरोपी मोहम्मद सादिक खात्री याला भेटली. मोहम्मद सादिक खत्री तिच्याशी बोलू लागला आणि उमरगाम स्थानकावर ट्रेन थांबल्यावर त्याने तिला जबरदस्तीने ट्रेनमधून बाहेर काढलं. त्याने तिला नवसारीहून मुंबईला पोहोचण्यास मदत करण्याचंही आश्वासन दिले.
हेही वाचा >> पत्नीशी वाद झाला म्हणून तरुणाने दुचाकीसह मारली विहिरीत उडी, वाचवायला गेलेल्या चौघांसह पाच जणांचा मृत्यू
जेव्हा ते नवसारीला पोहोचले तेव्हा खत्रीने मुलीला एका निर्जन ठिकाणी नेले आणि संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही तासांत त्याने तिच्यावर दोनदा बलात्कार केला. मध्यरात्री १ च्या सुमारास (ऑक्टोबर १९) खत्रीने तिला वसईला थांबलेल्या मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये सोडले. तेव्हा भेदरलेल्या मुलीने तिच्या मामाला बोलावले.
मामाच्या मदतीने तिने लागलीच पोलीस ठाणे गाठले. २४ ऑक्टोबर २०२१ ला मोहम्मद खत्रीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याला जेव्हा अटक केली तेव्हा त्याच्याकडे लिंगवर्धित गोळ्या सापडल्या.
सहाय्यक सरकारी वकील एजे टेलर म्हणाले, “पोलिसांना त्याचे कपडे सापडले. त्यावर रक्ताचे डाग होते. पोलिस आणि फॉरेन्सिक टीमला घटनास्थळावरून मुलीचे केस तसेच तिचे केस पिन आणि विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील सापडले.” आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देताना न्यायालयाने म्हटले आहे की, “समाजात अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाची प्रकरणे वाढत असताना, न्यायालयाने शिक्षा सुनावण्याबाबत संयम बाळगू नये. अल्पवयीन पीडितेच्या वेदना समजून घेण्यासाठी उच्च पातळीची संवेदनशीलता आवश्यक आहे. अशा प्रकरणांमध्ये, पीडितेला अनेकदा पालक, पोलीस, वकील आणि न्यायालय यांच्यासमोर तिची अनेकवेळा परीक्षा घेतली जाते, जे तिच्यासाठी खूप त्रासदायक असू शकते.”