बंगालच्या ढाण्या वाघाची मोजदाद करण्याची ऐतिहासिक मोहीम बांगलादेशात एप्रिल महिन्यापासून सुरू होत असून बांगलादेशच्या सीमेत असलेल्या सुंदरबनच्या जंगलातील वाघाची नेमकी आकडेवारी त्यामुळे स्पष्ट होणार आहे. जगभरातील वाघांचे अस्तित्व आत नामशेषाच्या मार्गावर असल्याने वाघांच्या संरक्षणाचे उपाय योजण्याबरोबरच वाघांची अचूक संख्या सिद्ध होणे आवश्यक असल्याने कॅमेरा ट्रॅपिंगची आधुनिक पद्धती बांगलादेशातील वन्यजीवतज्ज्ञांनी अवलंबिली आहे. या पद्धतीत काही त्रुटी असल्याची टीका होत असली तरी जुन्या पगमार्क पद्धतीपेक्षा यातून अधिक अचूक आकडेवारी मिळू शकते, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
बांगलादेशच्या हद्दीतील सुंदरबनच्या पट्टय़ात भारताच्या पश्चिम बंगालमधील सुंदरबनच्या जंगलातून नेहमी स्थलांतरण होत असते. यामुळे दोन्ही देशांना वाघांची नेमकी संख्या काढण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बांगलादेशच्या वन खात्याचे प्रमुख युनुस अली यांनी दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशातील सुंदरबनच्या जंगलात झाडांवर कॅमेरे लावले जाणार असून २००४ च्या व्याघ्र गणनेच्या तुलनेत अधिक अचूक आकडेवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
बांगलादेशच्या सीमेतील सुंदरबनमध्ये ४४० ढाणे वाघ आहेत. परंतु, ही आकडेवारी अचूक नसल्याची टीका वन्यजीवतज्ज्ञांनी केली आहे. जुन्या पगमार्क पद्धतीने काढलेल्या आकडेवारीतील त्रुटी लक्षात घेता जास्तीत जास्त १५०-२०० वाघ असावेत. वाघांची अपरिमित शिकार पाहता यापेक्षाही कमी संख्येने वाघ अस्तित्वात असल्याचे वन्यजीवज्ज्ञांनी म्हटले आहे. बांगलादेशात दरवर्षी किमान सरासरी पाच वाघांची सिकार केली जाते. एकतर गावकरी वाघांची हत्या करतात किंवा वाघ शिकारी टोळ्यांना बळी पडतात.  
 बांगलादेशातील व्याघ्रगणनेत अमेरिकास्थित स्मिथसोनियन कंझव्‍‌र्हेशन अँड बायोलॉजी इन्स्टिटय़ूटचे तज्ज्ञ मदत करणार आहेत. येत्या दोन वर्षांत वाघांची गणना पूर्ण होणार असून कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये येणाऱ्या वाघांच्या हालचालींच्या अंदाजावरून नेमकी संख्या निश्चित केली जाईल. व्याघ्र गणनेची पगमर्क पद्धती वादाचा विषय झालेली आहे. त्यामुळे नवे सर्वेक्षण अचूक राहील, असा विश्वास युनुस अली यांनी व्यक्त केला. बांगलादेशच्या जहाँगीर विद्यापीठाचे प्राणीशास्त्राचे प्रोफेसर व आघाडीचे व्याघ्र विशेषज्ञ मोनीरूल खान यांनी बांगलादेशातील वाघांची संख्या २०० पेक्षा जास्त नसावी, अशी भीती व्यक्त केली. कॅमेरा ट्रॅपिंग ही नवी पद्धती जुन्या पगमर्क पद्धतीच्या तुलनेत अधिक सरस असून त्याचे निकाल अचूक राहतील, असा दावा त्यांनी केला.

एक लाखावरून ३२०० वर घसरण
जगातील वाघांच्या संख्येत रॉयल बेंगॉल टायगरची संख्या १८५० असल्याचा डब्लूडब्लूएफ या संस्थेचा अंदाज आहे. त्यापैकी १३०० वाघ भारतात अस्तित्वात आहेत. भारतात २००३-०४ साली सुंदरबनला झालेल्या व्याघ्र गणनेत सुंदरबनच्या वनांमध्ये २७० वाघ असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. परंतु, तज्ज्ञांच्या मते ही संख्या जास्तीत जास्त १०० आहे. जगभरातील वाघांचे अस्तित्व धोक्यात असून कधीकाळी १ लाख संख्या असलेली वाघांची प्रजाती आता ३२०० पर्यंत घसरली आहे.

Story img Loader