आपल्या राजनैतिक भेटीगाठींच्या धावपळीतून वेळ काढून ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी मंगळवारी दिल्लीतील एका महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनीशी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासमवेत बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही होता.अवघ्या काही सेकंदातच तुमच्याशी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि आमिर खान संवाद साधणार आहेत, असे जानकीदेवी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी जाहीर करताच विद्यार्थिनींना आसमंत ठेंगणे झाले.
जवळपास चार तासांची प्रतीक्षा संपल्यानंतर कॅमेरून आणि खान अवतरले. अखेरच्या क्षणापर्यंत या संदर्भात गुप्तता पाळण्यात आली होती. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ४६ वर्षीय कॅमेरून आणि त्यांच्यापेक्षा केवळ एकच वर्ष मोठा असलेला आमिर खान सभागृहात अवतरले. उभयतांनी तब्बल ४५ मिनिटे सभागृहात फेरफटका मारून विद्यार्थ्यांशी हितगुज केले.
निळ्या रंगाच्या सुटात असलेले कॅमेरून आणि स्वेटशर्ट परिधान केलेला आमिर खान यांच्यावर विद्यार्थ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. महिलांबाबत समाजाचा दृष्टिकोन पक्षपाती का आहे, असा सवाल त्यांनी उभयतांना केला. मात्र दोघांनीही हसतमुखाने प्रश्नांना उत्तरे
दिली. कॅमेरून आणि खान यांच्यासमवेत आपले छायाचित्र काढून घेण्याची हौसही विद्यार्थ्यांनी पुरविली आणि या दोघांनाही कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत.महिलांना सापत्नभावाची वागणूक नेहमीच का दिली जाते, असा पहिलाच प्रश्न खान यांना विचारण्यात आला. पुरुष हे महिलांपेक्षा अधिक सक्षम असतात असा एक विचार असतो, मात्र देशाची प्रगती हवी असेल तर स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार थांबविले पाहिजेत, असे खान
 म्हणाले.
विद्यार्थ्यांनी केवळ महिलांबाबतचेच प्रश्न विचारले. भ्रष्टाचार आणि अन्य विषयांना त्यांनी स्पर्श केला नाही, असे खान यांनी वार्ताहरांना सांगितले.

Story img Loader