राम जेठमलानींवर कारवाईची शक्यता
भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये गुरफटलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची जाहीर मागणी करून भाजपमधील वाद चव्हाटय़ावर मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा सदस्य राम जेठमलानी यांनी पक्षशिस्त मोडीत काढल्याबद्दल पुढच्या काही दिवसांत कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, जेठमलानी यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्यानंतरही गडकरी यांच्यावर पक्षातूनच होणारे हल्ले थांबणार नसल्याचे समजते.
गडकरी यांच्या अखत्यारीतील पूर्ती उद्योग समूहातील कथित भ्रष्टाचार गेल्या तीन आठवडय़ांपासून चर्चेचा विषय बनला आहे. सरकारकडून या भ्रष्टाचाराच्या चौकशीला सामोरे जाण्याची खुद्द गडकरींनी तयारीही दर्शविली आहे. भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही चौकशीला सामोरे जाण्याच्या गडकरी यांच्या भूमिकेचे जाहीरपणे स्वागत केले होते. त्यानंतर या प्रकरणी नवे काहीही घडले नसताना भाजपच्याच काही नेत्यांनी ८९ वर्षीय जेठमलानी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गडकरींवर नेम धरला आणि मंगळवारी दिवसभर विपर्यस्त बातम्यांच्या माध्यमातून अशी काही हूल उठविली की गडकरींना राजीनामा द्यावा लागणार अशीच वातावरणनिर्मिती झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली तसेच संघाचे तत्त्वचिंतक आणि आर्थिक विषयांचे तज्ज्ञ एस. गुरुमूर्ती यांनी गडकरींना या संकटातून तारून नेले. पण त्यामुळे गडकरींच्या राजीनाम्याचा हट्ट धरणारे जेठमलानी यांचा ‘रोष’ कमी झालेला नाही. मंगळवारी रात्री कोअर ग्रुपच्या बैठकीत गडकरींना क्लीन चिट देऊन भाजप भ्रष्टाचाराविरुद्धच्या संघर्षांत नैतिक आधार गमावून बसला असून हा जनतेचा विश्वासघात आहे, अशी जाहीर टीकेची तोफ जेठमलानी यांनी आज पुन्हा डागली. भाजप नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत मतभेदांवर जाहीर टिप्पणी टाळावी, असे कोअर ग्रुपच्या बैठकीअंती स्वराज-जेटली यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात आवाहन केले होते. पण हा मुस्कटदाबीचा आदेश आपल्याला लागू होत नसल्याचे जेठमलानी यांनी म्हटले आहे. भाजपमध्ये राहून आपण गडकरींविरुद्धचा संघर्ष सुरूच ठेवण्याचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा न देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. गडकरी यांच्यावर हल्ला चढवून भाजपची शोभा करणाऱ्या जेठमलानी पितापुत्रांना लवकरच दंडित केले जाण्याची शक्यता आहे. या गोष्टीची जेठमलानी यांना कुणकुण लागल्यामुळेच राम जेठमलानी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. पक्षशिस्त मोडीत काढल्याबद्दल जेठमलानी यांची पक्षातून हकालपट्टी होते की त्यांना निलंबित केले जाते, याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे. महेश जेठमलानी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याचा प्रश्न येत नाही. पण जेठमलानी यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गडकरी यांचा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ येत्या १९ डिसेंबर रोजी संपणार आहे. पण त्यापूर्वीच गडकरी यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यास भाग पडेल, अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी भाजपमधील बडय़ा नेत्यांचा एक गट सक्रिय झाल्याचे समजते. भाजपचे अध्यक्षपद डोळ्यापुढे ठेवून गडकरींना कचाटय़ात पकडण्याची मोहीम आखली जात असून या नेत्यांपाशी वेळ कमी असल्यामुळे गडकरी यांना पळता भुई थोडी होईल, असा ससेमिरा लावण्यासाठी येत्या महिन्याभरात या मोहिमा आणखी तीव्र होतील असे विश्वसनीय गोटातून समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा