बिहारमध्ये ५ नोव्हेंबर रोजी पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असून मंगळवारी या निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकामेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या त्यामुळे निवडणूक आयोगाने उच्चपदस्थ नेत्यांवर कारणे-दाखवा नोटिसा बजावल्या.
पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात बिहारमध्ये ५७ जागांसाठी मतदान होणार असून त्यापैकी २४ जागा सीमांचल क्षेत्रातील आहेत. पश्चिम बंगालच्या सीमेवरील मधुबनी, दरभंगा, सुपौल, मधेपुरा, सहरसा, अरारिया, किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार या नऊ जिल्ह्य़ातील हे ५७ मतदारसंघ आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने जद(यू), राजद आणि काँग्रेसवर हल्ला चढविला. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सहिष्णुतेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे मोदी यांनी १९८४ च्या शीखविरोधी दंगलींचे उदाहरण देऊन सांगितले.
मोदी यांनी जवळपास ३० सभा घेतल्या, एखाद्या राज्यातील निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी इतक्या सभा घेण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. मोदी यांच्या आरोपांवर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे नेते लालूप्रसाद यांनी प्रतिहल्ला चढविला.

सहा दिवसांत मोदीच धडा शिकतील -लालूप्रसाद
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांना सत्तेचा आनंद उपभोगण्यासाठी केवळ सहा दिवसच उरले आहेत, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चढविला. मात्र मोदी हेच धडा शिकतील असा प्रतिहल्ला लालूप्रसाद यांनी चढविला आहे. मोदी यांनाच जनता सहा दिवसांत धडा शिकवील, बिहारचे निकाल आल्यानंतर कदाचित मोदी यांनाच सत्ता सोडणे भाग पडेल, असे लालूप्रसाद म्हणाले.

Story img Loader