हैदराबाद : तेलंगण विधानसभा निवडणुकीचा प्रचार मंगळवारी समाप्त झाला. राज्यातील ११९ जागांसाठी गुरुवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील तीन कोटी २६ लाख मतदार कुणाच्या बाजुने कौल देणार याची उत्कंठा आहे. तेलंगणसह राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरम या चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार, ३ डिसेंबर रोजी होईल.
तेलंगणमध्ये भारत राष्ट्र समिती सर्व ११९ तर भाजप १११ जागा लढवित आहे. भाजपने जनसेना या मित्रपक्षाला ८ जागा सोडल्या आहेत. काँग्रेस ११८ जागा लढवत असून त्यांनी एक जागा डाव्या पक्षाला सोडली आहे. एआयएमआयएमने नऊ उमेदवार दिले आहेत. सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्याचा बीआरएसचा प्रयत्न असला तरी जनमत चाचण्यांनी सत्तांतराचे भाकीत वर्तवले आहे. राज्यभरात २,२९० उमेदवार रिंगणात आहेत. बीआरएसचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव गजवाल व कामारेड्डी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवित आहेत. तेलंगणमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून, ऑक्टोबर ९ पासून ७३७ कोटी रुपयांची रोकड, अमली पदार्थ, मद्य तसेच मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.