रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढतच आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढणे ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे भारताने म्हटले आहे. रशिया-युक्रेन संकट कमी करण्याला त्वरित प्राधान्य दिले पाहिजे, असं युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलने बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत भारताने म्हटले आहे.
रशियाचा मोठा निर्णय! युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता; युद्धाचे ढग अजून गडद
यूएनएससीच्या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती म्हणाले, “रशिया-युक्रेन संकटाची तात्काळ प्राथमिकता डी-एस्केलेशन आहे. सीमेवर लष्कर वाढणं, हे आमच्यासाठी योग्य असू शकत नाही. आम्ही सर्वांना संयम बाळगण्याचं आवाहन करतो. हा प्रश्न केवळ राजनैतिक संवादातूनच सोडवला जाऊ शकतो, याची आम्हाला खात्री आहे. तसेच तणाव कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षांनी अलीकडे घेतलेल्या काही पुढाकारांबद्दल विचार करण्याची गरज आहे.”
तिरुमूर्ती यांनी युक्रेनवरील यूएनएससीच्या बैठकीत सांगितले की, “रशियन फेडरेशनसह युक्रेनच्या सीमेवर वाढत असलेला तणाव ही गंभीर चिंतेची बाब आहे. या घडामोडींमुळे प्रदेशातील शांतता आणि सुरक्षा बिघडू शकते. तसेच घडामोडी घडत असताना दोन्ही देशांच्या नागरिकांची सुरक्षा आवश्यक आहे. २० हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक युक्रेन आणि त्याच्या सीमावर्ती भागात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि अभ्यास करत आहेत, भारतीयांना या परिस्थितीत सुरक्षित ठेवणं आणि तिथून बाहेर काढणं, याचा आमचं प्राधान्य आहे,” असं ते म्हणाले.
एअर इंडियाची विमानं युक्रेनला रवाना –
“रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढतच आहे. अशा परिस्थितीत या देशामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान आज सकाळी युक्रेनला रवाना झाले. २०० पेक्षा जास्त आसन क्षमता असलेले ड्रीमलायनर बी-787 विमान विशेष ऑपरेशनसाठी पाठवण्यात आले आहे,” अशी बातमी एएनआयने दिली.
युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता –
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे ढग अजून गडद होताना दिसत आहेत. रशियाने आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनमधील दोन प्रांताना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. जनतेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून यामुळे तणाव आणखी वाढण्याची भीती आहे. रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.