सईदा लुलु मिनहाज झैदी या हैदराबादच्या विद्यार्थिनीने ऑगस्ट २०२१ मध्ये मास्टर्स करण्यासाठी अमेरिका गाठली होती. तेलंगणच्या हैदराबादची ती रहिवासी आहे मात्र आता हीच मुलगी विपन्न अवस्थेत आढळून आली आहे. मिनहाजची आई फातिमाने तिला ऑगस्ट २०२१ नंतर या व्हायरल व्हिडीओत पाहिलं आणि तिला मुलीची अवस्था पाहून धक्काच बसला. मी माझ्या मुलीला ओळखूही शकत नाही असं आता मिनहाजच्या आईने म्हटलं आहे.

मिनहाजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मिनहाज झैदी या विद्यार्थिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वीच व्हायरल झाला आहे. यामध्ये मिनहाज ही शिकागोतल्या रस्त्यांवर दिसते आहे आणि तिची अवस्था खूपच वाईट आहे. काही लोकांनी तिला अन्न दिलं. आता तिची आई फातिमाने परराष्ट्र मंत्रालयाला विनंती केली आहे की माझ्या मुलीला मदत केली जावी. व्हिडीओ पाहून मिनहाजची आई फातिमा म्हणाली “मी माझ्या मुलीला ओळखूही शकत नाही. तिच्यात बराच बदल झाला आहे. ती इतरांशी संवाद साधत असताना अशा प्रकारे कधी बोलत नव्हती.” फातिमा यांनी फ्री प्रेस जर्नलशी बोलत असताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. २२ जुलैला मी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना ही विनंती केली आहे की माझ्या मुलीला परत आणलं जावं. असंही फातिमा यांनी सांगितलं.

मजलिस बचाओ तेहरीकचे प्रवक्ते अमजद उल्लाह खान यांनी पोस्ट केला व्हिडीओ

मजलिस बचाओ तेहरीकचे प्रवक्ते अमजद उल्लाह खान यांनी या मुलीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच ती रस्त्याच्या एका कडेला बसली आहे आणि अन्न-पाणी मागते आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. शिकागोमध्ये तिची अवस्था खूपच वाईट झाली आहे असंही त्यांनी म्हटलंय.

या व्हिडीओत सईदा हे सांगते आहे की ती हैदराबादची आहे. तिची अशी अवस्था का झाली? असं विचारल्यावर ती सांगते की मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे गेल्यावर माझी प्रकृती आणखी बिघडली. माझ्या शरीरातून रक्ताचे काही नमुने घेण्यात आले त्यानंतर माझी प्रकृती अजून खालावली असं तिने सांगितलं आहे. या व्हिडीओत तिला एक व्यक्ती पोळी आणि डाळ देताना दिसतो आहे तसंच मदतीचं आश्वासनही देतो आणि भारतात परत जा असा सल्लाही त्याने तिला दिला आहे.

दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी माझ्या मुलीला मदत करावी आणि तिला भारतात परत आणावं अशी विनंती सईदाच्या आईने केली आहे. सईदाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यावर व्यक्त होत आहेत. तिची अवस्था पाहून आम्हाला धक्का बसला आहे असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. मिनहाजला तिचं नावही नीट सांगता येत नाहीये असंही या व्हिडीओत दिसतं आहे.

Story img Loader