बिहारमधील राजकीय घडामोडी दिवसेंदिवस रंजक वळण घेत असतानाच सोमवारी भाजपने नितीश कुमार यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले. भाजप आणि नितीश कुमारांची ही युती प्रत्यक्षात आल्यास आगामी काळात बिहार व देशातील राजकीय समीकरणांवर प्रभाव पडू शकतो. नितीश कुमार यांचा जदयू पक्ष सध्या लालूप्रसाद यादव यांच्या राजदसोबत सत्तेत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत सीबीआयने घोटाळ्याच्या विविध प्रकरणांमध्ये लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांभोवतीचे चौकशीचे फास आवळले आहेत. त्यावरून नितीश कुमार राजदशी फारकत घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र, राजदची साथ सोडल्यास नितीश कुमार यांचे सरकार कोसळू शकते. त्यामुळे नितीश हा निर्णय घेण्यास कचरत असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी बिहार भाजपकडून नितीश कुमारांना पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करण्यात आली. नितीश महाआघाडीतून बाहेर पडल्यास राज्याच्या कल्याणासाठी भाजप त्यांना बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहे, असे बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी म्हटले. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्त्वच घेईल, असेही सांगायला ते विसरले नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा