Canada Targets India Again: गेल्या वर्षी कॅनडामध्ये हरदीपसिंग निज्जर या खलिस्तान समर्थक दहशतवाद्याची हत्या झाली. या प्रकरणी कॅनडाच्या पंतप्रधानांनी थेट त्यांच्या संसदेत भारताचा सहभाग असल्याचे गंभीर आरोप केले. तेव्हापासून कॅनडाशी भारताचे द्वीपक्षीय संबंध बिघडले आहेत. आता ते आणखी ताणले जातील अशी कृती कॅनडाकडून करण्यात आली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेत दिलेली प्रतिक्रिया दाखवली म्हणून कॅनडानं चक्क एका वृत्तसंस्थेलाच ब्लॉक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारावर भारतानं तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी कॅनडानं निज्जर हत्या प्रकरणात भारतावर केलेल्या आरोपांबाबत भाष्य केलं होतं. ‘दी ऑस्ट्रेलिया टुडे’ या वृत्तसंस्थेनं ही पत्रकार परिषद त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर दाखवली. त्यानंतर काही वेळातच या वृत्तसंस्थेचे सोशल मीडिया हँडल्स ब्लॉक झाल्याच्या तक्रारी कॅनडातील युजर्सकडून येऊ लागल्या. विशेष म्हणजे ‘फाईव्ह आय इंटेलिजन्स’ या मोहिमेखाली पाच देशांच्या आघाडीमध्ये अमेरिका, ब्रिटन व न्यूझीलंडसह कॅनडा व ऑस्ट्रेलिया हे देशही आहेत.
भारतानं नोंदवला तीव्र शब्दांत निषेध!
दरम्यान, भारताकडून कॅनडाच्या या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. “आम्हाला असं समजलंय की त्या विशिष्ट वृत्तसंस्थेचे सोशल मीडिया हँडल्स ब्लॉक करण्यात आले आहेत. कॅनडामधील युजर्सला ते पाहाता येत नाहीयेत. या हँडल्सवरून एस. जयशंकर व पेनी वोंग यांची मुलाखत दाखवण्यात आल्यानंतर काही तासांत हे घडायला लागलं. त्याशिवाय या वृत्तसंस्थेनं जयशंकर यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत अनेक बातम्याही प्रकाशित केल्या होत्या. हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं. हे आमच्यासाठी विचित्र आहे”, असं जयस्वाल म्हणाले. “पण यातून पुन्हा एकदा कॅनडाची अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतची दुहेरी भूमिकाच स्पष्ट होत आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.
काय म्हणाले होते जयशंकर पत्रकार परिषदेत?
एस. जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत कॅनडानं निज्जर हत्या प्रकरणा भारतावर केलेल्या आरोपांबाबत भाष्य केलं होतं. “मी तीन गोष्टी सांगेन. एक म्हणजे कॅनडानं कोणत्याही सबळ पुराव्यांशिवाय भारतावर आरोप करण्याची एक पद्धत तयार केली आहे. दुसरं म्हणजे कॅनडानं भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांवर पाळत ठेवणं आमच्यासाठी पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. तिसरं म्हणजे कॅनडात हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांवर हे स्पष्ट होत आहे की तिथे कट्टर खलिस्तार समर्थकांना तिथल्या राजकारणात निश्चित असं स्थान देण्यात आलं आहे”, असं जयशंकर या पत्रकार परिषदेत म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd