गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. कॅनडा सातत्याने भारतावर वेगवेगळे आरोप करत आहे. तर भारताकडूनही त्यास चोख प्रत्युत्तर दिल जातंय. अशातच आता पुन्हा एकदा कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. कॅनडामध्ये एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येनंतर याप्रकरणी भारतावर चिखलफेक करणाऱ्या कॅनडाने आता भारताला ‘परकीय संकट’ म्हटलं आहे. कॅनडाने म्हटलं आहे की, भारत आपल्यासाठी एक ‘परकीय संकट’ असून ते आपल्या देशातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करू शकतात. भारत सरकारने अद्याप कॅनडाच्या या आरोपांना उत्तर दिलेलं नाही. ग्लोबल न्यूजने मिळवलेल्या गुप्तचर अहवालानुसार कॅनडाच्या सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिसेसने हा आरोप केला आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या झाली होती. या हत्येनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी याप्रकरणात भारताच्या सहभागाचा उल्लेख केला होता. तेव्हापासून उभय देशांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत, जे अजूनही चालूच आहे. दरम्यान, भारताने आतापर्यंत कॅनडाच्या प्रत्येक आरोपाचं खंडण केलं आहे.
भारताचं ‘परकीय संकट’ असं वर्णन करणाऱ्या अहवालात परकीय हस्तक्षेपामुळे कॅनडाची लोकशाही कमकुवत होत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ग्लोबल न्यूजने या अहवालाचा दाखला देत म्हटलं आहे की, हा परकीय हस्तक्षेप पारंपरिक मुत्सद्देगिरीपेक्षा वेगळा आहे. दरम्यान, कॅनडाने भारतावर पहिल्यांदाच असा आरोप केला आहे. कॅनडाने यापूर्वी चीन आणि रशियावर असे आरोप केले होते. कॅनडासाठी परकीय संकट असणाऱ्या देशांच्या यादीत त्यांनी आता रशिया आणि चीनबरोबर भारताचं नावही जोडलं आहे.
हे ही वाचा >> कॅनडात आणखी एका खलिस्तानी दहशताद्यावर हल्ला, हरदीपसिंह निज्जरच्या मित्राच्या घरावर गोळीबार
या अहवालात म्हटलं आहे की, परकीय हस्तक्षेपामुळे कॅनडातील लोकशाही धोक्यात येऊ शकते. असे परकीय हस्तक्षेप हळूहळू आपली लोकशाही कमकुवत करू लागले आहेत. आपला बहुसांस्कृतिक समाज मोठ्या कष्टाने उभा राहिला आहे आणि एकत्र आला आहे. परंतु, आपल्या एकात्मतेला धक्का पोहोचवणं, कॅनेडियन लोकांच्या हक्कांची गळचेपी करणं, येथील नियमांचं उल्लंघन करण्याचे प्रकार समोर येत आहेत. दरम्यान, कॅनडाच्या पंतप्रधानांनी या आरोपांची आणि अहवालातील मुद्द्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.