Chrystia Freeland Resigns: कॅनडाच्या उपपंतप्रधान तथा अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी सोमवारी अचानक राजीनामा दिला. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्याशी धोरणात्मक बाबींवर मतभेद झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, अर्थमंत्री असलेल्या क्रिस्टिया संसदेत ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दलचा अहवाल मांडणार होत्या. मात्र त्याच्या काही तास अगोदर त्यांनी राजीनामा दिला. पंतप्रधान ट्रुडो यांनी खर्चात प्रचंड वाढ केली असून त्यांची ही राजकीय खेळी असल्याचा आरोप क्रिस्टिया यांनी केला.
पंतप्रधान ट्रुडो यांनी योजनांवर खर्च करण्यासाठी सरकारी तिजोरी खुली केली आहे. त्यांच्या या धोरणावर ५६ वर्षीय फ्रीलँड यांनी टीका केली. वाढत्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाला हे परवडणारे नाही, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान ट्रुडो यांना दिलेले राजीनामा पत्र त्यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.
“कॅनडाला सर्वोत्तम मार्गावर नेण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून आपल्यात मतभेद सुरू आहेत. शुक्रवारी तुम्ही मला सांगितले की, तुमच्या मंत्रिमंडळात तुम्ही मला अर्थ खात्यातून मुक्त करून दुसऱ्या विभागाची जबाबदारी देणार आहात. त्यानंतर मी विचार केला आणि मंत्रिमंडळातून बाहेर पडणे हाच माझ्यासाठी उत्तम आणि एकमेव व्यवहार्य मार्ग असल्याचे मला उमजले”, अशी भावना फ्रीलँड यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या राजीनाम्याची मागणी
क्रिस्टिया यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान ट्रुडो यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यू डोमोक्रेटिक पार्टीचे (NDP) नेते जगमीत सिंग यांनी ट्रुडो यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच संसदेच्या २३ खासदारांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी पत्र लिहिले आहे. तसेच ट्रुडो हेदेखील राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, असे वृत्त कॅनडामधील माध्यमांनी दिली आहे.