Mark Carney To Be Canada PM Again: सोमवारी कॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. मंगळवारी ३४३ जागांसाठी झालेल्या मतांची मोजणी करण्यात आली. मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारपर्यंत कॅनडाची सूत्र पुन्हा एकदा मार्क कार्नी यांच्याकडेच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आणि लिबरल पक्षानं एकच जल्लोष केला. दुसरीकडे कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे उमेदवार पिएर्रे पॉलिव्हरे यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला. विशेष म्हणजे या निवडणुकीत १७ पंजाबी व्यक्ती निवडून आल्या आहेत. तर खलिस्तानी समर्थक जगमीत सिंह बर्नबी यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. मार्क कार्नी यांच्या धोरणांनुसार कॅनडाशी गेल्या काही वर्षांत ताणले गेलेले भारताचे द्विपक्षीय संबंध सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मार्क कार्नी यांचा हल्लाबोल

डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफ वॉरच्या पडछायेत कॅनडामध्ये या निवडणुका पार पडल्या. या पार्श्वभूमीवर निवडून आल्यानंतर केलेल्या भाषणात मार्क कार्नी यांनी अमेरिकेच्या या धोरणावर टीकास्र सोडलं. “या फक्त पोकळ धमक्या नाहीत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्याल पूर्णपणे उद्ध्वस्त करू इच्छितात, जेणेकरून अमेरिकेला आपला ताबा घेता येईल. पण ते कधीच शक्य होणार नाही”, असं मार्क कार्नी म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेच्या आक्रमक धोरणासमोर कॅनडातील नागरिकांनी एकतेचं धोरण पाळायला हवं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. “आपल्याला अमेरिकेनं केलेल्या विश्वासघाताचा धक्का बसला आहे. पण यातून आपल्याला मिळालेला धडा आपण कदापि विसरता कामा नये”, असंही ते म्हणाले.

भारतासाठी सकारात्मक संकेत?

कॅनडाच्या पंतप्रधानपदी मार्क कार्नी यांची निवड होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर हा भारतासाठी सकारात्मक संकेत असल्याचं मानलं जात आहे. जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मार्क कार्नी यांची पक्षाच्या अधिवेशनात निवड करण्यात आली. महिन्याभरापूर्वी झालेल्या या अधिवेशनात अमेरिकेच्या टॅरिफ वॉरचा सामना करण्याचा निर्धार मार्क कार्नी यांनी व्यक्त केला होता.

“समविचारी देशांबरोबर कॅनडा व्यापारी संबंध वाढवेल. भारताबरोबर संबंध सुधारण्याचीही संधी आहे. मी पंतप्रधान झालो, तर त्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करेन”, असं मार्क कार्नी तेव्हा म्हणाले होते. मार्क कार्नी यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं अभिनंदन करणारी पोस्ट एक्सवर शेअर केली आहे.

पराभवानंतर काय म्हणाले पॉलिव्हरे?

मार्क कार्नी यांच्याविरोधात पराभूत झालेले कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे उमेदवार पिएर्रे पॉलिव्हरे यांनी निकालानंतर संयत प्रतिक्रिया दिली. “आम्ही विजयापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर अतिम रेषा पार करू शकलो नाही. आम्हाला याची कल्पना आहे की बदल आवश्यक आहे. पण बदल होणं ही कठीण बाब आहे. ती घडून येण्यासाठी वेळ लागेल. फार मोठे कष्ट लागतील. त्यामुळेच आजच्या पराभवातून आम्ही धडा घ्यायला हवा, जेणेकरून पुढच्या वेळी जेव्हा कॅनडाची जनता देशाचं भवितव्य ठरवत असेल, तेव्हा आम्हाला अधिक चांगले निकाल पाहायला मिळतील”, अशी प्रतिक्रिया पॉलिव्हरे यांनी दिली.

कॅनडाच्या संसदेत एकूण ३४३ सदस्य आहेत. प्रत्येक मतदारसंघातून एका सदस्याला कॅनडाची जनता निवडून देते. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला १७२ जागांचा बहुमताचा आकडा गाठणं आवश्यक आहे. नुकत्याच पार पडलेल्या मतमोजणीमध्ये लिबरल पक्षाचे मार्क कार्नी यांच्यासह पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या विजयामुळे लिबरल पक्षानं बहुमताचा आकडा पार केला आहे.