कॅनडातून सातत्याने खलिस्तान समर्थकांवरील हल्ल्यांच्या बातम्या समोर येत आहेत. आज (२ फेब्रुवारी) अशीच एक घटना समोर आली आहे. ओटावा येथील एका खलिस्तान समर्थकाच्या घरावर मध्यरात्री गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलीस म्हणाले, आम्ही सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहोत. तसेच ज्या घरावर हल्ला झाला त्यांच्या शेजाऱ्यांनी सागितलं की, हे घर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या एका मित्राचं आहे.
ब्रिटिश कोलंबिया गुरुद्वारा परिषदेच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, ज्या घरावर हल्ला झाला ते घर सिमरनजीत सिंह याचं आहे. सिमरनजीत हा हरदीप सिंह निज्जरचा खास मित्र होता. जून २०२३ मध्ये हरदीप सिंह निज्जरची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर भारत आणि कॅनडामध्ये राजकीय तणाव निर्माण झाला आहे.
पोलीस सध्या सिमरनजीत सिंह यांच्या शेजाऱ्यांकडे चौकशी करत आहेत. त्याचबरोबर सिमरनजीतच्या घराजवळच्या रस्त्यांवरील कॅमेऱ्यांचं फूटेज तपासत आहेत. रात्री झालेल्या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची पोलिसांनी पुष्टी केली आहे.
स्थानिक वृत्तवाहिनी सीबीसी न्यूजने म्हटलं आहे की, रात्री बराच वेळ गोळीबाराचा आवाज येत होता. या गोळीबारात एका कारच्या दरवाजाची चाळण झाली आहे, तसेच कारच्या काचा फुटल्या आहेत. त्याचबरोबर घराच्या भिंतीवर आणि घरातही गोळ्यांचे ठसे उमटले आहेत.
हे ही वाचा >> Video: भाजपाच्या हिंदुत्वाला काँग्रेस हरवू शकते का? प्रशांत किशोरांनी आकडेवारीच मांडली; म्हणाले, “३८ टक्के नाही…!”
ब्रिटिश कोलंबिया गुरुद्वारा परिषदेचे प्रवक्ते मोनिंदर सिंह म्हणाले, त्या घराचा मालक सिमरनजीत सिंह हा हरदीप सिंह निज्जरचा मित्र असल्यामुळेच त्या घरावर हल्ला करण्यात आला आहे.