Indira Gandhi Killing In Exhibition : कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तानी समर्थकांनी ५ किमी मोठी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत भारताच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा चित्ररथ चालवण्यात आला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. यासह त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना हा मुद्दा कॅनेडियन सरकारसमोर उपस्थित करण्याची मागणी केली आहे.
खलिस्तानी समर्थकांनी काढलेल्या या मिरवणुकीचा व्हिडीओ काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये इंदिरा गांधींचा पुतळा दिसतोय. पुतळ्या रक्तालाने माखलेली साडी नेसवलेली आहे. तसेच या पुतळ्यासमोर बंदूक रोखून उभे असलेले शिख हल्लेखोर (जे इंदिरा गांधींचे सुरक्षारक्षक होते) दिसत आहे. या चित्ररथाद्वारे इंदिरा गांधींच्या हत्येचा सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न खलिस्तान समर्थकांनी केला आहे.
कॅनडाने आपल्या भूमीवरून भारतविरोधी घटकांना कारवाया करण्याची मुभा देणे हे द्विपक्षीय संबंधांसाठी, तसेच त्याच्या स्वत:साठीही चांगले नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हे केवळ मतपेटीचं राजकारण असू शकतं. अशी टीका जयशंकर यांनी केली.
हे ही वाचा >> सलूनमध्ये ५० रुपयांचं यूपीआय पेमेंट केलं अन्.., मुंबईतून फरार झालेला बलात्काराचा आरोपी बिहारमध्ये पकडला गेला
दरम्यान, भारतातील कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरॉन मॅकाय यांनी भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा कॅनडामध्ये उत्सव साजरा केल्याच्या वृत्ताचा निषेध केला आहे. द्वेष किंवा हिंसाचाराचे उदात्तीकरण यांना कॅनडात काहीही स्थान नाही’, असं ट्वीट कॅमेरून यांनी केलं आहे.