Canada : कॅनडातील ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिरातील एका कार्यक्रमावरून काही दिवसांपासून वाद सुर आहे. काही दिवसांपूर्वी कॅनडातील हिंदूंवर खलिस्तानी हल्ला झाला होता. एवढंच नाही तर हिंदू सभा मंदिरात एका कार्यक्रमादरम्यान मंदिराच्या बाहेर खलिस्तानी झेंडे फडकवल्याचं समोर आलं होतं. यावरून बराच वाद झाला आणि त्यानंतर हिंदू मंदिराच्या पुजाऱ्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत पुजाऱ्याची हकालपट्टीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, यानंतर पुन्हा ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात येणार होता. पण पुन्हा खलिस्तानी धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या ठिकाणी होणारा कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंसाचाराच्या भीतीमुळे ब्रॅम्प्टनमधल्या हिंदू मंदिराचा हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, ब्रॅम्प्टन त्रिवेणी मंदिर प्रशासनाने अशा स्वरुपाच्या हिंसाचाराच्या धोक्यामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव आपला कार्यक्रम रद्द केला आहे. यासंदर्भात मंदिर प्रशासनाकडून निवेदन देखील जारी करण्यात आलं आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

हेही वाचा : Keral IAS officer: हिंदू-मुस्लीम व्हॉट्सॲप ग्रुप बनवणं महागात पडलं; केरळमध्ये दोन आयएएस अधिकारी निलंबित

निवेदनात म्हटलं आहे की, “ब्रॅम्प्टन त्रिवेणी मंदिर येथे भारतीय दूतावासाने १७ नोव्हेंबर २०२४ रोजी नियोजित केलेला लाईफ सर्टिफिकेट इव्हेंट रद्द करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंसाचाराच्या भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सध्या रद्द करण्यात आला असून पुन्हा लवकरच आयोजित केला जाईल”, असं म्हटलं आहे.

यासंदर्भात माहिती देताना पोलीस अधिकारी निशान दुरैप्पा यांनी म्हटलं की, हा कार्यक्रम पुढे ढकलल्यामुळे सध्याची तणावाची परिस्थिती काहीसी कमी होईल. तसेच याबाबत मंदिर प्रशासनाकडून खंत व्यक्त करण्यात आली. ‘आम्ही या कार्यक्रमावर अवलंबून असलेल्या सर्व समुदाय सदस्यांची माफी मागतो. कॅनडातील हिंदू मंदिरांमध्ये आता कॅनेडियन लोकांना असुरक्षित वाटू लागल्याने आम्हाला खूप दुःख आहे’, असं म्हटलं आहे.

तसेच आम्ही येथील प्रशासनाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवाहन करतो. याबाबत आम्ही पोलिसांना ब्रॅम्प्टन त्रिवेणी मंदिराविरूद्ध दिल्या जाणाऱ्या धमक्यांचे निराकरण करण्यासाठी आणि कॅनेडियन हिंदू समुदाय आणि सामान्य जनतेला सुरक्षिततेची हमी देण्यासाठी मागणी करत आहोत. दरम्यान, याआधी ३ नोव्हेंबर रोजी ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरातील कॉन्सुलर कॅम्प हिंसाचारामुळे मोठा गोंधळ झाला होता. यावरून कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canada khalistani news event canceled at hindu temple in brampton canada gkt