Canada : कॅनडातील ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. खलिस्तानी झेंडे घेऊन आलेले आंदोलक आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये झालेल्या संघर्षात चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. हिंदू सभा मंदिरात कॉन्सुलर कार्यक्रमाच्यादरम्यान मंदिराच्या बाहेर आंदोलकांनी खलिस्तानी झेंडे फडकवले होते. यानंतर त्या ठिकाणी हिंसाचार उसळला होता. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी ब्रॅम्प्टनमध्ये घडली होती.

३ नोव्हेंबर रोजी ब्रॅम्प्टनमधील मंदिराबाहेर निदर्शकांनी खलिस्तानी झेंडे फडकावले आणि त्यानंतर मोठा गोंधळ झाला होता. या गोंधळांचं रूपांतर हिंसाचारात झालं होतं. यासंदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओमध्ये मंदिराच्या परिसरात मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. या घटनेनंतर ब्रॅम्प्टन शहराचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी पुजाऱ्याच्या विधानाचा निषेध केला.

हेही वाचा : मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?

तसेच ब्रॅम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी म्हटलं की, कोणत्याही धर्मगुरूंनी हिंसक वक्तृत्व किंवा समुदायामध्ये हिंसा आणि द्वेष वाढेल असे विधान करू नये. या ठिकाणी बहुसंख्य शीख कॅनेडियन आणि हिंदू कॅनेडियन सामंजस्याने राहतात. ते कसल्याही प्रकारचा हिंसाचार सहन करत नाहीत. दरम्यान, यानंतर हिंदू सभा मंदिराचे अध्यक्ष मधुसूदन लामा यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी पुजाऱ्याचे निलंबन केलं आहे. यासंदर्भात हिंदू सभा मंदिराकडून बुधवारी एक निवेदनही प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

या घटनेचा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही निषेध केला. त्यांनी म्हटलं की, प्रत्येक कॅनेडियन नागरिकाला या ठिकाणी मुक्तपणे आणि सुरक्षितपणे त्यांच्या विश्वासाचे पालन करण्याचा अधिकार आहे. तसेच समुदायाचे रक्षण करण्यासाठी आणि या घटनेची चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिल्याप्रकरणी स्थानिक प्रशासनाचे आभार.

ब्रॅम्प्टनमध्ये तणावपूर्ण वातावरण

हिंसाचारानंतर ब्रॅम्प्टनमध्ये तणावाचं वातावरण आहे. खलिस्तानी झेंडे घेऊन आलेल्या आंदोलकांनी मंदिराचे पुजारी आणि भारतीय वाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॉन्सुलर कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यामध्ये दोन गट एकमेकांवर लाठ्या मारताना दिसून आले होते. त्यामुळे ब्रॅम्प्टनमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.