जवळपास वर्षभरापूर्वी अमेरिकेत एका इमारतीच्या पार्किंगमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची हत्या करण्यात आली होती. त्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा धक्कादायक आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. यात इतरही काही देशांनी कॅनडाच्या भूमिकेला पाठिंबा देणारी विधानं केली होती. अजूनही या प्रकरणाचा तपास चालू असतानाच कॅनडानं पुन्हा एक धक्कादायक कृती केली आहे. इटलीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जी ७ परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भेट झाली. त्यामुळे या प्रकरणावर तोडगा निघेल असं वाटत असतानाच कॅनडाच्या या कृत्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेमकं काय घडलं?
कॅनडाच्या संसदेत मंगळवारचं कामकाज शेवटाकडे आलं असताना संसद अध्यक्षांनीच यासंदर्भात प्रस्ताव मांडला. “या सभागृहात सर्वपक्षीय नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मला असं वाटतंय की वर्षभरापूर्वी हरदीप सिंग निज्जर याची ब्रिटिश कोलंबिया परिसरात हत्या करण्यात आल्याबद्दल सभागृहात दोन मिनिटांचं मौन पाळण्यावर सर्व सभासदांची सहमती झाली आहे”, असं कॅनडाच्या संसदेचे अध्यक्ष ग्रेग फेर्गस यांनी म्हटलं. यानंतर सभागृहातील सर्व सभासद उठून उभे राहिले. दोन मिनिटांचं मौन पाळून नंतर कामकाज संपलं.
१८ जून २०२३ रोजी हरदीपसिंग निज्जरची सुरे परिसरातील एका गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या घटनेचा निषेध आणि हरदीपसिंग निज्जरला श्रद्धांजली वाहण्यासाठी हे मौन पाळण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, भारतानं ज्या व्यक्तीला मोस्ट वाँटेड यादीत टाकलं आहे आणि ज्या व्यक्तीवर खलिस्तानी भूमिका घेऊन कारवाया करण्याचे आरोप आहेत, अशा व्यक्तीसाठी कॅनडाच्या संसदेत मौन पाळलं जाणं निषेधार्ह असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.
कॅनडाचे आरोप भारतानं फेटाळले!
गेल्या वर्षी हरदीप सिंग निज्जरची हत्या झाल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत बोलतानाच या प्रकरणात भारताचा सहभाग आहे का, यासंदर्भात आमचा तपास चालू आहे, अशी माहिती दिली होती. त्यावर भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भारतानं हे सर्व आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले होते. तसेच, कॅनडातील आपल्या उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या भारतानं कमी केली होती. अशाच प्रकारचं पाऊल नंतर कॅनडानंही उचललं होतं. या प्रकरणामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.
हरदीप सिंग निज्जर कोण होता? खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून कॅनडाने भारतावर आरोप का केले?
चार भारतीयांना अटक, तपास चालू
दरम्यान, कॅनडामधील तपास संस्थांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात आत्तापर्यंत चार भारतीयांना अटक केली आहे. मात्र, यासंदर्भात नेमका तपास कोणत्या दिशेनं चालू आहे, याबाबतची माहिती समोर आलेली नसून भारत सरकारकडून त्याचे तपशील मागवण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच, या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप कॅनडानं समोर ठेवले नसल्याची आपली भूमिका भारत सरकारनं कायम ठेवली आहे.