खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो पुन्हा चर्चेत आले आहेत. ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत केलेल्या एका कृतीमुळे त्यांच्यावर त्यांच्या विरोधकांसह कॅनडातील इतर अभ्यासक व सामान्य नागरिकांकडूनही टीका केली जाऊ लागली होती. हे प्रकरण अधिक तापत असल्याचं लक्षात येताच या कृतीसाठी थेट कॅनडाच्या संसदेचे अध्यक्ष अँथनी रोटा यांनी त्यासाठी माफी मागितली आहे.
का चर्चेत आहेत जस्टिन ट्रुडो?
काही दिवसांपूर्वी जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर निज्जर हत्या प्रकरणात गंभीर आरोप केले. भारताच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची कॅनडातून हकालपट्टीही केली. तसेच, आपण भारताला भडकवण्यासाठी हे केलं नसून भारतानं या प्रकरणाकडे गंभीर्यानं लक्ष द्यावं यासाठी हे केल्याचंही ते म्हणाले. जस्टिन ट्रुडो यांच्या या आरोपांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भारतानंही कॅनडाच्या दिल्लीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली असून कॅनडातील व्हिसा सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. या प्रकरणावरून सध्या दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले असतानाच आता ट्रुडो पुन्हा चर्चेत आले आहेत.
कॅनडातील खलिस्तान समर्थकांसाठी भारतातून हवालामार्फत गेला पैसा! NIA च्या चार्जशीटमध्ये मोठा खुलासा!
आता जस्टिन ट्रुडो यांनी काय केलं?
रविवारी कॅनडाच्या संसदेत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गेल्या आठवड्याभरापासून झेलेन्स्की कॅनडाच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दुसऱ्या महायुद्धात नाझी फौजांच्या बाजूने लढणाऱ्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याचा उभं राहून टाळ्या वाजवत सन्मान केला. या प्रकाराचे तीव्र पडसाद कॅनडामध्ये व सोशल मीडियावरही पाहायला मिळाले.
ट्रुडो यांचे विरोधक व पंतप्रधानपदाचे दावेदार पायरे पॉलिवरे यांनी ट्रुडोंना लक्ष्य केलं आहे. “ट्रुडो यांच्या पक्षानं झेलेन्स्की यांच्या भेटीदरम्यान देशाच्या संसदेत नाझी अधिकाऱ्याचा सन्मान करण्याचं नियोजन केलं. पण यात मुख्य चूक जस्टिन ट्रुडो यांचीच आहे. कारण संसदेमध्ये एखाद्या अतिथीचा सन्मान करायचा असल्यास त्याचं नियोजन पंतप्रधान कार्यालयाकडून केलं जातं”, अशी टीका पॉलिवरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये केली आहे.
संसद अध्यक्षांची माफी
दरम्यान, हे प्रकरण तापत असल्याचं लक्षात येताच कॅनडाचे संसद अध्यक्ष अँथनी रोटा यांनी देशातील व जगभरातील ज्यू समुदायाची माफी मागितली आहे. “संसदेतील इतर सदस्य व युक्रेनच्या शिष्टमंडळालाही जस्टिन ट्रुडो यांच्याकडून संबंधित नाझी अधिकाऱ्याचं कौतुक केलं जाणार असल्याबाबत काहीही माहिती नव्हती. त्यांनी प्रत्यक्ष त्यांचं निवेदन केल्यानंतरच सभागृहाला हे समजलं”, असं रोटा आपल्या माफीनाम्यामध्ये म्हणाले.