Donald Trump Tariff War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी अनेक देशांवर जशास तसा आयातकर लावला. यामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. भारतासह अनेक देशांवर आयातकर लावण्यात आला असून अनेक देशांनी यावर अद्याप उघडपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. भारतानेही सावध भूमिका घेत याचा अभ्यास करणार असल्याचे म्हटले. मात्र कॅनडाने अमेरिकेच्या कर वृद्धीला जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी जाहीर केले की, अमेरिकेच्या सर्व वाहनांवर ते २५ टक्के आयातकर लावणार आहेत.

पंतप्रधान मार्क कार्नी यांनी आयातकर वाढविण्याबाबत पत्रकार परिषद घेतली आहे. त्यात ते म्हणाले, आम्ही हे पाऊल उचलणार नव्हतो. मात्र आता आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे. या निर्णयाचा अधिक फटका अमेरिकेला बसणार असून आमच्यावर याचा फारसा परिणाम होणार नाही. अमेरिका-मेक्सिको-कॅनडा व्यापार कराराचे नियम न पाळणाऱ्या ऑटो कंपन्यावर कॅनडाकडून २५ टक्के आयातकर लावला जाणार आहे, असेही कार्नी यांनी सांगितले. तसेच या निर्णयातून मेक्सिकोला वगळण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मार्क कार्नी पुढे म्हणाले की, आम्ही ऑटो पार्ट्सवर ट्रम्प यांच्यासारखा आयातकर लावणार नाही. अमेरिकेच्या निर्णयामुळे त्यांनाच याचा फटका बसणार आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे. तसेच आजची जागतिक अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अतिशय वेगळी आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा विरोध सर्वांनी एकजुटीने करायला हवा, असेही ते म्हणाले.

अमेरिकेने कॅनडावर लादला होता कर

४ मार्च रोजी अमेरिकेने कॅनडामधील वस्तूंवर २५ टक्के कर लादला होता. त्यानंतर १२ मार्च रोजी स्टील आणि अल्युमिनियमच्या उत्पादनांवर २५ टक्के कर लावला. तसेच ३ एप्रिल रोजी कॅनडाच्या ऑटो क्षेत्राला लक्ष्य करून त्यावर २५ टक्के आयातकर लावला.

कॅनडामधून निर्यात होणाऱ्या उत्पादनांमध्ये ऑटो उत्पादनांचा दुसऱ्या क्रमाकांचा वाटा आहे. या क्षेत्रात कॅनडामधील लाखो लोक थेट जोडलेले आहेत. तसेच ऑटोशी निगडित इतर क्षेत्रात जवळपास पाच लाख लोक काम करतात.

दरम्यान अमेरिकेने २ एप्रिल २०२५ या दिवसाला अमेरिकेच्या इतिहासातील मूक्तिदिन म्हटले आहे. या दिवसांपासून अमेरिकेतील उद्योगांना नवसंजीवनी मिळणार असून त्यांचा पुनर्जन्म होईल, असे ते म्हणाले. अमेरिकेला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि पुन्हा श्रीमंत बनविण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे ते म्हणाले.