Canada PM Mark Carney : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धचा निर्णय असेल किंवा अमेरिकेच्या समृद्धीसाठी महत्वाचे निर्णय असतील, नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क) असेल, कॅनडा आणि मेक्सिकोवरील आयात शुल्कचा निर्णय असेल किंवा अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या विदेशी कार्सवर अधिकचा कर लागू करण्याचा निर्णय असेल, असे अनेक मोठे निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प घेत असलेल्या अनेक निर्णयांचा फटका जगभरातील देशांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर नवे आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी कॅनडाच्या अमेरिकेबरोबरच्या संबंधांबाबत मोठं विधान केलं आहे. ‘अमेरिकेशी जुने संबंध संपले’, असं पंतप्रधान मार्क कार्नी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

मार्क कार्नी यांनी कॅनडा आणि अमेरिकेच्या संबंधांबाबत भाष्य करताना कॅनडाचे अमेरिकेसोबतचे जुने संबंध संपुष्टात आले असल्याचं म्हटलं आहे. कॅनडातील ओटावा या शहरात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अमेरिकेच्या टॅरिफचे घोरणासंदर्भात चर्चा झाली. यावेळी मार्क कार्नी यांनी टॅरिफबाबत बोलताना हे अयोग्य असल्याचं म्हटलं. मार्क कार्नी म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकन ग्राहकांमध्ये संभाव्य आर्थिक संकट निर्माण होईल. हा एक अर्थव्यवस्थेवर थेट हल्ला आहे. आम्ही आमच्या कामगारांचे रक्षण करू. आम्ही आमच्या कंपन्यांचे रक्षण करू. आम्ही आमच्या देशाचे रक्षण करू”, असं ते म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या विदेशी कार व कारसाठीचं साहित्य या गोष्टींवर तब्बल २५ टक्के कर लागू करण्याचा निर्णय नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतला आहे. याबाबत बोलताना कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी म्हटलं की,’कॅनडाचे अमेरिकेशी जुने संबंध संपले संपले आहेत. जे मुळात अर्थव्यवस्था एकसंध ठेवण्याच्या बाबतीत आणि सुरक्षा व लष्करी सहकार्य वाढवण्यावर आधारित होते. पण आता ते अस्तित्वात नाहीत.”

डोनाल्ड ट्रम्प यांचा विदेशी कारसंदर्भातला निर्णय काय आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी विदेशी कारसंदर्भातला एक मोठा निर्णय जाहीर केला. यानुसार, आता अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या विदेशी कार व कारसाठीचं साहित्य या गोष्टींवर तब्बल २५ टक्के कर लागू होणार आहे. हे नवे कर येत्या ३ एप्रिलपासून लागू होणार आहेत. काही कंपन्यांच्या तयार कार्स अमेरिकेत आयात केल्या जातात, तर काही विदेशी कंपन्यांच्या कारचे वेगवेगळे पार्ट अमेरिकेत आयात होतात व तेथील प्लांटमध्ये ते जोडले जातात. अमेरिकेतील या दोन्ही प्रकारच्या व्यवसायांवर यामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे.