Justin Trudeau on Hardeep Singh Nijjar Murder Case: गेल्या वर्षभरापासून भारत व कॅनडा यांच्यातील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. खलिस्तानी फुटीर नेता हरदीपसिंग निज्जर याची कॅनडामध्ये गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर हा तणाव वाढला. तेव्हा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा थेट आरोप केला. तसेच, यासंदर्भात आम्ही सखोल चौकशीही करत आहोत, असं ते म्हणाले. भारतानं यावर पुरावे द्या, आम्ही कारवाई करू, असंही सांगितलं. पण कॅनडानं त्यावर सबळ पुरावे सादर केलेले नाहीत. पण आता खुद्द जस्टिन ट्रुडो यांनीच धक्कादायक कबुली दिली असून आरोप करताना आमच्याकडे पुरावे नव्हते, असं ते म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सगळ्या प्रकारासंदर्भात कॅनडाच्या अंतर्गत चौकशी समितीसमोर सविस्तर माहिती देताना जस्टिन ट्रुडो यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे कॅनडाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या संसदेत केलेला दावा हा कोणत्याही पुराव्याशिवायच असल्याचं सिद्ध झालं आहे. भारतानं जस्टिन ट्रुडो यांच्या या कबुलीचा निषेध करताना आम्ही सुरुवातीपासून जे सांगत होतो, तेच खरं ठरलं, असं म्हटलं आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा द्वीपक्षीय तणाव वाढला असून दोन्ही देशांनी परस्परांच्या देशात असणारे राजनैतिक उच्चपदस्थ अधिकारी परत बोलावले आहेत.

काय म्हणाले जस्टिन ट्रुडो?

जस्टिन ट्रुडो यांनी निज्जर हत्या प्रकरणातील भारताच्या सहभागाबाबतचे आरोप फक्त गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केल्याचं कबूल केलं आहे. “मला हे सांगण्यात आलं होतं की कॅनडामधून आणि आमच्या इतर पाच मित्र देशांमधून आलेल्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचं ढळढळीतपणे दिसून येत आहे. एका कॅनेडियन नागरिकाची कॅनडाच्या भूमीवर हत्या करण्याच्या कटात भारत सरकारच्या प्रतिनिधींचा सहभाग होता”, असं ट्रुडो म्हणाले आहेत.

Who Was Hardeep Singh Nijjar: हरदीप सिंग निज्जर कोण होता? खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून कॅनडाने भारतावर आरोप का केले?

“ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही तातडीने भारत सरकारशी याबाबत संवाद साधला. भारत सरकारनं आमच्याकडे पुरावे मागितले. त्यावर आम्ही ‘पुरावे तर तुमच्या सुरक्षा यंत्रणेमध्येच आहेत’, असं उत्तर दिलं. पण भारत सरकार पुरावे सादर करण्याबाबत ठाम होतं. पण तेव्हा आमच्याकडे सबळ पुरावा नव्हता, तर फक्त गुप्तचर यंत्रणेकडून आलेली माहिती होती. त्यामुळे आम्ही भारताला सांगितलं की आपण एकत्र मिळून तुमच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेऊ, कदाचित आपल्याला तिथे पुरावे सापडतील”, असंही जस्टिन ट्रुडो यांनी नमूद केलं.

नेमकं काय घडलं होतं गेल्या वर्षी?

हरदीप सिंग निज्जर याची गेल्या वर्षी जून महिन्यात कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाच्या सुरे भागात एका पार्किंग लॉटमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात निज्जर याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेच्या तीन महिन्यांनंतर कॅनडाच्या संसदेत केलेल्या भाषणात जस्टिन ट्रुडो यांनी जाहीरपणे निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canada prime minister justin trudeau admits no evidence against india in hardeep singh nijjar murder case pmw