गेल्या आठवड्याभरापासून कॅनडातील हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण जगभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. कारण कॅनडानं या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. चार दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशाच्या संसदेत हा आरोप केल्यानंतर त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ट्रुडो यांच्या आरोपांनंतर जागतिक पातळीवर अमेरिका व ऑस्ट्रेलियानं कॅनडाची बाजू घेतली आहे. मात्र, ट्रुडो यांनी आरोप करण्याआधी महिन्याभरात दोन वेळा कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोडी थॉमस भारतात येऊन गेल्याची माहिती आता समोर येत आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
जोडी थॉमस-अजित डोवाल भेट
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर जाहीरपणे आरोप करण्याआधीही कॅनडानं या हत्या प्रकरणाची भारताची चर्चा केली होती, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे. ट्रुडो यांच्या आरोपनाट्याआधी महिन्याभरात दोन वेळा कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोडी थॉमस भारतात येऊन गेल्याचं समोर आलं आहे. या दौऱ्यात थॉमस यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणावर चर्चा केली. यावेळी भारताच्या सहभागाच्या संशयाबाबतही त्यांनी डोवाल यांना सांगितल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
ट्रुडो-मोदी यांच्यात जी २० परिषदेतच चर्चा?
दरम्यान, एकीकडे कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या भारत दौऱ्याची माहिती समोर येत असताना दुसरीकडे दिल्लीत ९, १०, ११ सप्टेंबर रोजी झालेल्या जी २० परिषदेदरम्यान खुद्द पंतप्रधान जस्टिन ट्रुडो व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातही निज्जर हत्या प्रकरणाबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या चर्चेवेळी ट्रुडो यांनी निज्जर हत्या प्रकरणात भारत सरकारचा सहभाग असल्याचा संशय मोदींकडे व्यक्त केला होता. मात्र, तेव्हाही भारतानं हे आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले होते.
नेमकं काय आहे निज्जर हत्या प्रकरण?
१८ जून रोजी कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याची हत्या करण्यात आली. दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणाचा कॅनडातील तपास यंत्रणा तपास करत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशाच्या संसदेत या हत्येमध्ये भारत सरकारचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला. भारताच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. पाठोपाठ भारतानंही जाहीरपणे आरोप फेटाळत कॅनडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. आता भारतानं कॅनडातील व्हिसा सेवा तात्पुरती बंद केली आहे. दोन्ही देशांनी आपापल्या नागरिकांना एकमेकांच्या देशात प्रवास करताना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भारत-कॅनडा तणाव वाढला; पंतप्रधान ट्रुडो म्हणतात, “आम्हाला हे प्रकरण वाढवायचं नव्हतं, फक्त…”!
अमेरिकेची नेमकी भूमिका काय?
दरम्यान, जी २० परिषदेत मित्रत्वाच्या नात्याने मोदींशी हस्तांदोलन करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अवघ्या जगाने पाहिले. मात्र, या प्रकरणात अमेरिकेनं कॅनडाची बाजू घेतली आहे. “आम्ही कॅनडा व भारताच्या संपर्कात आहोत. अशा प्रकरणांमध्ये कोणत्याही देशाला अपवाद म्हणून वेगळी वागणूक देता यणार नाही. ट्रुडो यांचे आरोप आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे”, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलिवन यांनी दिली आहे.