गेल्या काही महिन्यांपासून भारत व कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध कमालीचे ताणले गेल्याचं पाहायला मिळालं आहे. खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशाच्या संसदेत केला होता. त्यावरून मोठा गदारोळ आणि आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर आता पुन्हा एकदा कॅनडानं आगळीक केली आहे. कॅनडामध्ये झालेल्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये भारतानं हस्तक्षेप केल्याचे आरोप होऊ लागले आहेत. या आरोपांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय कॅनडातील उच्चस्तरीय आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे आता द्विपक्षीय संबंध आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॅनडातील आयोगानं जाहीर केला निर्णय
एएनआय या वृत्तसंस्थेनं कॅनडातील स्थानिक वृत्तवाहिनी सीटीव्हीच्या हवाल्याने यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे. यानुसार, कॅनडातील ‘फेडरल कमिशन ऑफ इन्क्वायरी इंटू फॉरेन इंटरफेरन्स’ या सरकारनियुक्त आयोगाने निवडणुकांसंदर्भातील आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी या आयोगाकडून यासंदर्भातलं जाहीर निवेदन जारी करण्यात आलं आहे. या आयोगानं कॅनडा सरकारला यासंदर्भातले सर्व कागदपत्र सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत.
भारत-कॅनडा संबंध सुधारले? कॅनेडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा सुरू केल्यानंतर एस. जयशंकर म्हणाले…
२०१९ व २०२१ या दोन निवडणुकांची होणार चौकशी
२०१९ व २०२१ या दोन निवडणुकांमध्ये भारताकडून हस्तक्षेप करण्यात आल्याचे आरोप समोर येऊ लागले आहेत. या आरोपांची रीतसर चौकशी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी या आयोगाच्या जाहीर करण्यात आलेल्या उद्देशांनुसार चीन, रशिया व इतर देशांकडून कॅनडातील अंतर्गत बाबींमध्ये होणाऱ्या हस्तक्षेपांचा तपास नमूद करण्यात आला होता. त्यात आता भारतासंदर्भातही या आयोगामार्फत चौकशी केली जाणार आहे. ३ मे रोजी या आयोगाचा अहवाल सादर केला जाणार असल्याचंही एएनआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
भारत-कॅनडा संबंधांत तणाव
हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणामुळे भारत व कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची परत पाठवणी केली आहे. तसेच, कॅनडा अजूनही पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत मांडलेल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे हा संघर्ष निवळलेला नसतानाच आता या नव्या आरोपांमुळे पुन्हा त्यात भर पडण्याची शक्यता आहे.