पीटीआय, टोरांटो
खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येबाबत वाद उद्भवल्यानंतर, भारत व कॅनडा यांच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांच्या संख्येत समानता आणण्यासाठी कॅनडाने त्याच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याकरिता भारताने त्या देशाला १० ऑक्टोबरची मुदत दिली होती. यानंतर, कॅनडाने भारतात नवी दिल्लीबाहेर काम करणाऱ्या त्याच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांपैकी बहुतेकांना एक तर मलेशिया अथवा सिंगापूरमध्ये हलवले असल्याचे वृत्त एका माध्यमाने शुक्रवारी दिले.
हरदीपसिंग निज्जर याच्या जूनमधील हत्येशी भारतीय हस्तकांचा संबंध असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केल्यानंतर राजनैतिक वाद उद्भवला होता. त्यातून, कॅनडाने त्याच्या राजदूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी, असे भारताने या आठवडय़ाच्या सुरुवातीला सांगितले होते. त्यानंतर कॅनडातील ‘सीटीव्ही न्यूज’ या खासगी दूरचित्रवाहिनीने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. भारताने ट्रुडो यांचे आरोप ‘हास्यास्पद’ व ‘प्रेरित’ असल्याचे सांगून फेटाळले होते.
हेही वाचा >>>लँडर, रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता मावळली; ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांचे मत
कॅनडात भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या जितकी आहे, तितकीच कॅनडाने त्याच्या भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या कमी करावी यासाठी भारत सरकारने कॅनडाला १० ऑक्टोबर ही मुदत दिली असल्याचे वृत्त सीटीव्ही न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिले.
भारताच्या अटीनुसार कॅनडाच्या ४१ राजनैतिक कर्मचाऱ्यांना बाहेर जावे लागेल, असे पूर्वीच्या वृत्तात म्हटले होते, मात्र भारताने ही संख्या केवळ बरोबरीत आणण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी या वाहिनीला दिली. ‘भारतात नवी दिल्लीबाहेर काम करणाऱ्या बहुतांश कॅनडियन राजनैतिक कर्मचाऱ्यांना एक तर क्वालालंपूर किंवा सिंगापूरला हलवण्यात आले आहे,’ असे या वृत्तात म्हटले आहे.