वृत्तसंस्था, ओटावा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सत्ताधारी ‘लिबरल पार्टी’चे नेतेपद आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची सोमवारी घोषणा केली. मात्र, ‘लिबरल पार्टी’चा नवीन नेता निवडला जाईपर्यंत आपण पदावर कायम राहू असे त्यांनी स्पष्ट केले. ५३ वर्षीय ट्रुडो २०१५पासून कॅनडाचे पंतप्रधान असून त्यांना पक्षांतर्गत वाढते मतभेद आणि गेल्या दोन वर्षांपासून महागाई व घरांची टंचाई या कारणांमुळे जनतेमधील घटती लोकप्रियता या समस्या भेडसावत आहेत.
ट्रुडो यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणुका लढल्यास पक्षाचा मोठा पराभव होईल, असे अनेक पाहण्यांमधून आढळत आहे. त्यामुळे त्यांच्यावर पद सोडण्यासाठी पक्षातून मोठ्या प्रमाणात दबाव होता. त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये राजीनाम्याची घोषणा करताना पार्लमेंट २४ मार्चपर्यंत संस्थगित राहील असे सांगितले. तोपर्यंत लिबरल पार्टीला राष्ट्रीय निवडणुकीच्या मार्गाने पक्षाचा नेता निवडावा लागेल. हाच नेता कॅनडाचा पंतप्रधानही असेल. ट्रुडो आतापर्यंत कॅनडाचे सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदावर राहिलेले नेते आहेत. ‘लिबरल पार्टी’च्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये नवीन नेता निवडण्यासाठी हालचाली सुरू होतील.
हेही वाचा >>>Prashant Kishor : विद्यार्थ्यांसाठी उपोषणाला बसलेल्या प्रशांत किशोर यांना अखेर बिनशर्त जामीन मंजूर, नेमकं काय घडलं?
विरोधकांचे डावपेच बारगळणार?
पार्लमेंटचे कामकाज २७ जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार होते. विरोधी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने सरकार पाडण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी ते अविश्वासदर्शक ठराव मांडणार होते. मात्र, आता पार्लमेंट संस्थगित झाल्यामुळे तेथील कामकाजाच्या नियमाप्रमाणे मे महिन्यापर्यंत तरी विरोधकांना असा ठराव मांडता येणार नाही.
या देशाला पुढील निवडणुकीसाठी चांगली निवड करण्याचा हक्क आहे. मला हे कळून चुकले आहे की, जर माझ्यासमोर अंतर्गत लढाया असतील तर मी निवडणुकीसाठी सर्वोत्तम निवड असू शकत नाही. – जस्टिन ट्रुडो, पंतप्रधान, कॅनडा