पीटीआय, ओटावा
कॅनडाला भारतासोबत सध्या ‘भांडण’ नको असल्याचे अधोरेखित करतानाच, एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येबाबतच्या आपल्या आरोपांचा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुनरुच्चार केला आहे. या ‘अतिशय गंभीर प्रकरणाबाबत’ भारतासोबत ‘विधायकपणे काम करण्यास’ कॅनडा इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कॅनडाच्या चाळीसहून अधिक राजनैतिक अधिकाऱ्यांचे राजनैतिक संरक्षण काढून घेण्याची धमकी भारताने दिल्यामुळे त्यांना भारतातून हलवण्यात आले. यातून भारताने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले आहे, असाही आरोप ट्रुडो यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. सप्टेंबरमध्ये खलिस्तानी फुटीरवादी हरदीपसिंग निज्जर याच्या ब्रिटिश कोलंबियात झालेल्या हत्येमागे भारतीय हस्तकांचा हात असण्याची शक्यता असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे झाले होते. भारताने हे आरोप ‘हास्यास्पद’ म्हणून नाकारले आहेत.या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी एकत्रितरीत्या काम करण्याबाबत विचारणा करण्याकरिता आपल्या सरकारने भारताशी संपर्क साधला होता, असे ट्रुडो यांनी सांगितले.